नागपूर. राज्य कर्मचारी संघटना व इतर कर्मचारी संघटनांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह अन्य सेवा विषयक मागण्यासाठी १४ मार्च पासून बेमुदत संप पुकारला आहे. बेमुदत संपाच्या चौथ्या दिवशी शुक्रवारीसुद्धा जिल्हा परिषदेच्या १०० टक्के कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदविला. जिपच्या काही कर्मचाऱ्यांना गुरुवारी मेस्मा अंतर्गत सेवा खंडित का करण्यात येऊ नये, अशा आशयाची नोटीस बजावण्यात आली होती. आज आणखी काही कर्मचाऱ्यांना सेवा खंडित करण्याची बीडीओंनी नोटीस बजाविली. संपकरी कर्मचाऱ्यांनी नोटीस बजाविणाऱ्या बीडीओंचा निषेध नोंदविला. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली त्यांनी उत्तरे देऊ नये असे एकमताने ठरविण्यात आले. आज अनेक अंध व दिव्यांग बांधवांनी आंदोलनात सहभागी होऊन घोषणा दिल्या. शनिवारी भव्य मोर्चा काढण्याचाही निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
शनिवारी १८ मार्चला यशवंत स्टेडियम ते संविधान चौक दरम्यान सकाळी ११ वाजता नागपूर शहर व जिल्ह्यातील सर्व शासकीय – निम शासकीय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात सर्वजण पांढरे वस्त्र परिधान करून कर्मचारी सहभागी होणार आहेत. या मोर्चात किमान ५० हजार कर्मचारी सहभागी होणार असल्याचा दावा कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांनी केला आहे.
जिल्हा परिषदेत मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून सोमवारी २० मार्च पासून पुन्हा नव्या जोमाने जिल्हा परिषद परिसरात आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली.
आजच्या आंदोलनात संजय सिंग, डॉ. सोहन चवरे, अरविंद अंतूरकर, सुदाम पांगुळ, विजय बुरेवार, गोपीचंद कातुरे, अरविंद मदने, संजय तांबडे, सुजित अढाऊ, संतोष जगताप, भास्कर झोडे, किशोर भिवगडे, अक्षय मंगरुळकर, सुभाष पडोळे, जयंत दंढारे, योगेश राठोड, निरंजन पाटील, उमेश जायेभाये, योगेश हरडे, संगीता चंद्रिकापुरे, रंजना कांबळे, अलका खंते, हेमा सुरजुसे आदी कर्मचारी नेत्यांचा सहभाग होता.