मुंबईः राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात नवा वाद सुरु झाला असताना त्यांनी माफी मागावी अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडूनही यावर प्रतिक्रिया आली आहे (Agitation against Governor Bhagat Singh Koshyari ). आम्हाला हे राज्यपाल नको, अशी मागणी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. या राज्यापालांना कुठेही न्या. पण हे राज्यपाल महाराष्ट्रात नको, अशी मागणी त्यांनी केली असून महाराष्ट्राला समजून घेणारेच आम्हाला राज्यपाल हवेत असेही त्यांनी म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपला विनंती केली. ज्या राज्यपालांना आपला इतिहास माहिती नाही, त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल करूच नये, असेही संजय गायकवाड म्हणाले आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातले आदर्श असून मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे आदर्श तुम्हाला इथेच मिळतील, असे कोश्यारी म्हणाले होते. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या साऱ्याच पक्षांनी राज्यपालांवर कठोर शब्दात टीका केली असून त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. यात आता शिंदे गटानेही असे राज्यपाल आम्हाला नकोत, अशी मागणी केली आहे. महाराष्ट्राच्या मातीतीलच मराठी माणूसत राज्यपदावर बसवा. ह्या राज्यपालांना कुठे पाठवायचे आहे, तिथे पाठवा असे गायकवाड यांनी म्हटलं आहे.