

राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार व त्यांच्यासोबत असलेले उद्योग मंत्री उदय सामंत आणि पार्थ पवार नागपूर ते गडचिरोली हेलिकॉप्टर प्रवासात सुदैवाने बचावले आहेत. हेलिकॉप्टरने नागपूर ते गडचिरोली (Nagpur to Gadchiroli) असा प्रवास करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे हेलिकॉप्टर प्रवासा दरम्यान भरकटल्याची घटना घडली आहे.सुदैवाने या घटनेत दोन्ही उपमुख्यमंत्री बचावले असून या हेलिकॅाप्टरमध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) हेदेखील उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे नागपूरहून गडचिरोली दौऱ्यावर जात होते. या प्रवासादरम्यान त्यांचे हेलिकॅाप्टर खराब वातावरणामुळे ढगात भरकटले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे हेलिकॅाप्टर ढगात भरकटल्याची माहिती समोर येताच प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. मात्र, पायलटने प्रसंगावधान दाखवत हेलिकॅाप्टर जमीनीवर उतरवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, या घटनेनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले की, या घटनेमुळे माझ्या पोटात गोळाच उठला होता.मात्र, पांडुरंगाच्या कृपेने आम्ही सर्व सुखरुप खाली उतरलो.खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर ढगांमध्ये भरकटले होते. पंरतु, पायलटने मोठ्या कौशल्याने हेलिकॉप्टर (Helicopter) जमिनीवर उतरविल्याने मोठी दुर्घटना टळली, असे त्यांनी म्हटले.
भाजप हायकमांडचा मोठा निर्णय
काही दिवसात खाते बदल होण्याची शक्यता
आधी पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार होईल, अशी चर्चा होती. मात्र, तसे झाले नाही. आता विधानसभा निवडणुकाआधी विस्तार होईल, असे सांगण्यात आले. मात्र, विधानसभा निवडणुका तोंडावर भाजप हायकमांडने मोठा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार नाहीच, अशी माहिती मिळाली आहे. महायुती सरकार मध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याने अनेक इच्छुक नेते नाराज झाले आहेत. त्यांच्या आशा-अपेक्षांवर विरजण पडले आहे. मात्र, येत्या काही दिवसात खाते बदल होण्याची शक्यता आहे.
——–
पंढरपुरात विठू नामाचा गजर…
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल – रखुमाईची शासकीय महापुजा
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा देखील संपन्न झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक ही शासकीय महापूजा पार पाडली. भाविकांची विक्रमी गर्दी, टाळ मृदुंगाचा जयघोष, भजन, हरिनामाच्या गजराने अवघी पंढरपूर नगरी दुमदुमली आहे. पांडुरंगाच्या आशीर्वादाने सलग तीन वर्षे विठ्ठलाची महापूजा करण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. पाऊस चांगला झाला आहे. पेरण्या झाल्या, दुबार पेरणीचे संकट नाही. यंदा मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे सरकार चांगले काम करत आहे. चांगला पाऊस होऊ दे, बळीराजा सुखी होऊ दे. या राज्यातील प्रत्येक घटक सुखी आणि समृद्धी झाला पाहिजे”, असे साकडं एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाला घातले.
———–
लाडक्या भावांसाठीही योजना
12 वी झालेल्यांना महिन्याला 6 हजार
लाडकी बहीण या योजनेनंतर विद्यार्थ्यांसाठीही खास विद्यावेतन योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात केली आहे. बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार, डिप्लोमा 8 आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये विद्या वेतन देण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते पंढरीच्या पांडुरंगाची शासकीय महापूजा झाली. येथील कृषी पंढरी 2024 प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. राम कृष्ण हरी, बोला पुंडलिका वरद हरी श्री ज्ञानदेव तुकाराम .असे म्हणत भाषणाला सुरुवात केली. तसेच, पंढरपूरच्या वारीसाठी येणाऱ्या बसला अपघात झाल्यामुळे, मी डोंबिवलीत जाऊन अपघातातील जखमींची भेट घेऊन आलो. तसेच, डॉक्टरांना सूचनाही केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर, लाडकी बहीण योजनेवर भाष्य करत लाडक्या भावांसाठीही योजना असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
————–
आषाढी एकादशीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट
विठुरायाच्या चरणी साकडं
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र या शुभेच्छा देताना महाराष्ट्रातील सद्याची परिस्थिती पाहून राज ठाकरे यांनी विठुरायाच्या चरणी साकडं देखील घातले आहे. राज्यात सुरु असलेल्या जातीपातीच्या राजकारणावरुन एक पोस्ट लिहीत राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. समोर जे येईल ते स्वीकारत पुढे जायचं आणि विठ्ठलाकडे काहीही न मागता, जे वर्षभर घडणार आहे ती विठ्ठलाची इच्छा आहे असं मानण्याची आणि स्वीकारण्याची शक्ती घेऊन परत यायचं,” असे राज ठाकरेंनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
————-
अनुप धोत्रे यांच्या निवडणुकीला हायकोर्टात आव्हान
भ्रष्ट मार्गांचा अवलंब केल्याचा आरोप
अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे यांच्या निवडीला आव्हान देण्यात आलंय. यासंदर्भातील याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलीये. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील उमरदरी येथील मतदार गोपाल चव्हाण यांनी ही याचिका दाखल केलीये. अनुप धोत्रे यांनी निवडणुकीत जिंकण्यासाठी भ्रष्ट मार्गांचा उपयोग केल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केलाये. धोत्रे यांनी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली एकूण खर्चाची 95 लाखांची मर्यादा ओलांडल्याचा आरोपही त्यांनी या याचिकेत केला आहे. त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्यात यावी, असे याचिकाकर्ते गोपाल चव्हाण यांचे म्हणणे आहे.
—————
बंगल्याबाहेर असणारं अतिक्रमण स्वतःहून काढलं
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी खेडकर कुटुंबियांनी बंगल्याबाहेर असणारं अतिक्रमण स्वतःहून काढलं. महानगरपालिकेने नोटीस दिल्यानंतर खेडकर कुटुंबीयांच्या कामगारांनी अतिक्रमणाचा भाग काढला. पूजा खेडकर यांचा पुण्यातील बाणेर परिसरात आलिशान बंगला आहे. बंगल्याच्या बाहेर भिंतीला लागून अतिक्रमण करण्यात आलं होतं. यासंदर्भात अतिक्रमण काढण्यासाठी पुणे महानगरपालिकेने खेडकर कुटुंबीयांना नोटीस बजावून सात दिवसांची मुदत दिली होती.
——