मुख्यमंत्र्यांशी चर्चा, अर्धवट आरक्षणास जरांगेंचा नकार

0

(Jalna)जालना : मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन हिंसक झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणावर असलेले मनोज जरांगे यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी त्यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. अर्धा तास झालेल्या चर्चेत त्यांनी कुणबी प्रमाणपत्र, विशेष अधिवेशन, शिंदे समिती अशा विविध विषयांवर चर्चा केली. मात्र, मराठा समाज नोंदीनुसार अर्धवट आरक्षण घेणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी घेतल्याने पेच अद्यापही कायम आहे. दरम्यान, मराठवाड्यात परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आहे. (CM Eknath Shinde & Manoj Jarange Conversation on Maratha Reservation Issue )

मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे यांच्याशी संवाद साधला. नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाही व अर्धवट आरक्षण घेणार नाही, हे त्यांनी स्पष्टच सांगितले. आम्ही अभ्यासकांची बैठक बोलावली आहे. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा २००४ चा जीआर दुरुस्त करा. शेतीच्या आधारावरच आरक्षण दिलेले आहे. कितीही बहाणे सांगितले तरी आम्ही ऐकणार नाहीत. समितीकडे भरपूर पुरावे आहेत. सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. ६० ते ६५ टक्के मराठा समाज अगोदरच ओबीसी मध्ये आहे. आम्ही थोडे राहिलेलो आहोत. विशेष अधिवेशन घ्या, अशा मागण्या त्यांनी केल्या.
जरांगे यांनी सांगितले की, कालपासून मी पाणी पितोय. मी पाणी पिल्यानंतर समाज शांत होणार असेल तर मी पाणी पिणार. मी पुन्हा सांगतो उद्रेक करू नका, आत्महत्या करू नका. खांद्याला खांदा लावून लढा. पाण्यामुळे तब्येत चांगली झालीय, उठून बसलोय. सगळीकडे शांततेत उपोषण सुरू आहे.आमरण उपोषण जसे सहन होईल तसे करा, मात्र साखळी उपोषण सुरू ठेवा, असे आवाहन त्यांनी समाजाला केले आहे.