डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम

0

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपुरातील दीक्षाभूमीवर सकाळपासूनच बाबासाहेबांच्या अनुयायांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवरच बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करुन बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. बाबासाहेबांच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचं स्थान म्हणून दीक्षाभूमी ओळखली जाते. धम्मचक्र प्रवर्तन दिवस असो किंवा बाबासाहेबांची जयंती अशा सर्व महत्त्वाच्या दिवशी दीक्षाभूमीवर बौद्ध बांधवांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 132 वी जयंती. भंडारा येथील त्रिमूर्ती चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं.  या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री परिणय फुके, खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्यासह डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे मोठ्या प्रमाणात अनुयायी उपस्थित होते.

नवी मुंबईतील कळंबोली येथील सुधागड हायस्कूलच्या माध्यमातून भव्य अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीत 8 हजारपेक्षा अधिक विद्यार्थीवर्ग व 300 पेक्षा अधिक शिक्षक आणि कर्मचारी वर्ग सहभागी झाले होते. समाजप्रबोधन करण्याच्या हेतूने ही रॅली काढण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी होते. त्याचबरोबर विश्वरत्न, तत्वज्ञ, समाजसुधारक अशी डॉ बाबासाहेबांना संबोधली जाणारी विशेषणे व त्यांचे संदेश लिहून ही रॅली काढण्यात आली.यवतमाळ येथील संविधान चौकात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पालकमंत्री संजय राठोड यांनी अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे देशाची वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अभिवादन करण्यासाठी जनसमुदायाची सकाळपासून गर्दी झाली होती.

अमरावती येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांनी अभिवादन केलं, यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत आक्रमक प्रतिक्रिया दिली. या देशात सत्ताधारी संविधानाचा सन्मान करत नाहीत. संविधानाची तोडफोड करून राज्य सरकार स्थापन झालं आहे. संविधानाच्या विपरीत सरकार वागत आहे त्यामुळे अशा लोकांना बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा अधिकार नाही. संविधानाचा अपमान करून बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे नाटक करत आहे. त्याचा निषेध असल्याची प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली. उद्धव ठाकरे आणी राहुल गांधी हे दोन्ही नेते सालस आणी समजदार असून दोघांचाही उद्देश संविधान वाचविणे हाच आहे. त्यामुळे ते जो काही निर्णय घेतील तो या देशासाठी आणी महाराष्ट्रासाठी फायद्याचा राहील असंही आमदार ठाकूर राहुल गांधी – उद्धव ठाकरे यांच्या भेटीबद्दल बोलतांना म्हणाल्या.