Home Artical Blog डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी उलगडले अश्वत्थामाच्या जीवनाचे विविध पैलू

डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी उलगडले अश्वत्थामाच्या जीवनाचे विविध पैलू

0

विदर्भ साहित्य संघात ग. त्र्यं. माडखोलकर स्मृती व्याख्यानमाला संपन्न

नागपूर (Nagpur), दि. 19 एप्रिल

महाभारतातील अभिशप्त चिरंजीवी अश्वत्थामाचे ज्ञान एकांगी स्वरूपाचे होते, असे प्रतिपादन डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले. विदर्भ साहित्य संघाच्या ग. त्र्यं. माडखोलकर स्मृती व्याख्यानमालेच्या 46व्या पुष्पात ‘अश्वत्थामा’ या विषयावर ते आज बोलत होते.

डॉ. मिश्रा म्हणाले की, अश्वत्थामाचे व्यक्तिमत्त्व समजून घेण्यासाठी त्याचे वडील द्रोणाचार्य यांनी त्याला कशा प्रकारे घडवले, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. द्रोणाचार्य हे शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही विद्यात निपुण होते. मात्र, द्रुपद राजाकडून झालेल्या अपमानानंतर त्यांनी शस्त्रविद्येला अधिक महत्त्व दिले आणि त्याचा प्रभाव अश्वत्थामाच्या घडणीत दिसून येतो. कौरव-पांडवांच्या शिक्षणकाळात अश्वत्थामाला उच्चतम शस्त्रविद्या शिकवण्यात आली, परंतु त्याच्या ज्ञानात शास्त्राचा समतोल अभाव राहिला, असे त्यांनी नमूद केले.

अश्वत्थामाच्या बालपणीच्या गरिबीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, दूध नसल्यामुळे त्याच्या आईने तांदळाचे पाणी दूध म्हणून दिले, अशा प्रसंगांमुळे त्याच्या मनावर खोल परिणाम झाला. तसेच, द्रुपद राजाकडून द्रोणाचार्यांचा झालेला अपमान अश्वत्थामासमोरच झाला होता, यामुळे त्याच्या मानसिकतेवर परिणाम झाला. ब्रह्मास्त्रासारख्या अत्युच्च शस्त्रात निपुण असूनही शास्त्रज्ञानाचा अभाव त्याच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो, असे डॉ. मिश्रा यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी होते. त्यांनी प्रास्ताविकात ग. त्र्यं. माडखोलकर यांच्या परखड पत्रकारितेचा आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. माजी न्यायाधीश विकास सीरपूरकर यांनी अशा व्याख्यानमाला सातत्याने आयोजित व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभदा फडणवीस यांनी केले.

 

#Nagpur #VidarbhaSahityaSangh #DrVedprakashMishra #Ashwatthama #Mahabharat #LectureSeries #GTrambakMadkholkar #Sahitya #MarathiLiterature #IndianMythology #Dronacharya #CulturalEvent #NagpurEvents #ShankhnaadNews