वीर सावरकर गौरव यात्रा : राहुल गांधी, उद्धव ठाकरेंवर निशाना
मुंबई. भारतीय जनता पक्ष (BJP) आणि शिवसेनेने (Shiv Sena) राहुल गांधींविरोधात (Rahul Gandhi) आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोन्ही पक्षांकडून संयुक्तरित्या सावरकरांच्या सन्मानार्थ राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. ठाण्यातही ही यात्रा काढण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde ) यांनीही त्यात सहभाग नोंदविला. समारोपीय भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर एकाचवेळी टीकास्त्र डागले. काही लोक वीर सावरकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी, त्याना त्यांची जागा दाखवण्यासाठी ही सावरकर गौरव यात्रा काढण्यात आल्याचे सांगत त्यांनी गांधींना टार्गेट केले. त्याचवेळी ज्या राहुल गांधींनी वारंवार सावरकरांचा अपमान केला त्यांच्यासोबत बसण्याचं पाप काही लोक करत असल्याचे सांगत ठाकरेंवर बाण डागला. शिंदेंनी एक तीर मे दो निशाने साधल्याची प्रतिक्रिया उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उमटली.
शिंदे म्हणाले की, सावरकर देशभक्त, राष्ट्रभक्त, प्रखर हिंदुत्ववादी होते. त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा काढली आहे. पूर्वी लोक हिंदुत्व हा शब्द उच्चारायला कचरत होते. परंतु २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे हिंदुत्वाचा मान सन्मान जागा झाला. जाणीवपूर्वक हिंदुत्वाला बदनाम करण्याचं काम काही लोक करत आहेत. सावरकरांचे विचार रोखण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. देशातला हिंदू आता जागा झाला आहे, जागरुक झाला आहे आणि तो आता सक्रीय झाला आहे. पण काही लोक त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी, त्याना त्यांची जागा दाखवण्यासाठी ही सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली आहे.
सावरकरांचा अपमान केल्यामुळे मणिशंकर अय्यर यांना जोडे मारणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंचा वरसा सांगणारे लोक आता राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. ज्या राहुल गांधींनी वारंवार सावरकरांचा अपमान केला त्यांच्यासोबत बसण्याचं पाप काही लोक करत आहेत. हा प्रकार खपवून घेणार नसल्याचा दम त्यांनी भरला.