प्रसिद्ध निसर्गकवी ना. धो. महानोर यांचं निधन

0

(Pune)पुणे : (Famous nature poet N. D. Mahanor) प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर यांचे सकाळी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये निधन झाले. सकाळी साडेआठ वाजता वयाच्या ८१ व्या वर्षी महानोर यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ते व्हेंटीलेटरवरच होते. त्यांच्यावर उद्या शुक्रवारी त्यांचे गाव पळसखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महानोर यांनी साठ दशकांहून अधिक काळ काव्यसाधना केली आहे. मराठी काव्यविश्‍वात निसर्गकवी म्हणून महानोरांची ओळख आहे.

कवी महानोर यांचा जन्म (Palskhed) पळसखेडच्या शेतकरी कुटुंबात झाला. आई-वडील दुसऱ्याच्या शेतात राबत असत. महानोरांना चार भाऊ आणि तीन बहिणी. ते सगळ्यांत थोरले. प्राथमिक शिक्षण पळसखेडला झाल्यानंतर वयाच्या दहाव्या वर्षी ते पुढील शिक्षणासाठी शेंदुर्णीच्या शाळेत दाखल झाले. शेंदुर्णीच्या शाळेतच त्यांचा कवितेशी परिचय झाला व त्यांना कवितेची गोडी लागली. मॅट्रिक झाल्यानंतर ते जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयात कला शाखेत दाखल झाले. या महाविद्यालयात (M.N. Advant)म. ना. अदवंत, (Raja Mahajan)राजा महाजन अशा ‘साहित्यिक’ प्राध्यापकांकडून त्यांना भरपूर प्रोत्साहन मिळाले. परंतु, कौटुंबिक अडचणींमुळे त्यांना वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच शिक्षण सोडून गावी परतावे लागले. महानोर यांचे शिक्षण थांबले आणि ते शेतीतच रमले. पण, नंतर या रानकवीने मराठी साहित्यावर अमीट नाममुद्रा उमटवली. ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सदस्य देखील होते. त्यांच्या अद्भुत निसर्गकवितांनी वाचक-रसिकांना वेड लावले. निसर्ग आणि स्त्री ही महानोरांच्या कवितेची केंद्रस्थानं आहेत. इतकेच नव्हे तर जाहिरातींसाठी त्यांनी जिंगल्सचे लिखाणही केले होते.

गाजलेले कवितासंग्रह

महानोर यांचे अनेक कवितासंग्रह प्रचंड गाजलेले आहेत. त्यात अजिंठा, गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, त्या आठवणींचा झोका, दिवेलागणीची वेळ, पक्षांचे लक्ष थवे, पानझड, पावसाळी कविता, पळसखेडची गाणी (लोकगीते) या कवितासंग्रहांसह गपसप (कथासंग्रह) गावातल्या गोष्टी (कथासंग्रह), पु. ल. देशपांडे आणि मी, यशवंतराव चव्हाण आणि मी, शरद पवार आणि मी या व्यक्तीचित्रणाचाही समावेश आहे.

चित्रपटगीते

महानोरांनी चित्रपटांसाठी लिहिलेली गीतेही विशेष गाजली. यामध्ये एक होता विदूषक चित्रपटातील जाळीमधी झोंबतोया गारवा, तुम्ही जाऊ नका हो रामा, सूर्यनारायणा नित्‌ नेमाने उगवा या गीतांचा उल्लेख करावा लागेल. लावणी या साहित्यप्रकारात त्यांनी चित्रपटासाठी लिहीलेली ‘श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना’ ही लावणी प्रचंड गाजली. ‘दूरच्या रानात केळीच्या बनात’ हे त्यांचे गीत प्रचंड गाजले होते. याशिवाय त्यांनी अबोली, जैत रे जैत, दूरच्या रानात केळीच्या बनात (आल्बम), दोघी, मुक्ता, सर्जा, मालक, ऊरुस, अजिंठा, यशवंतराव चव्हाण या चित्रपटांसाठी गीतलेखन केले.