माती आणि पाण्याचे आरोग्य जपण्याचे उपाय करण्याची गरज-अरविंद कडबे

0

(Nagpur)नागपूर-जमिनीतील ओलावा संपलेला आहे तसा माणसाच्या मनातील ओलावा देखील संपलेला असून माणसाची संवेदना संपली की मातीकडे त्याचे दुर्लक्ष होते. केवळ ओरबाडून घेण्याच्या पाश्चात्य संस्कृतीच्या व्यवसाय पद्धतीनं मातीला काहीही न देता त्यासोबतच पाण्याचाही सत्यानाश केला असून रासायनिक शेतीच्या प्रयोगामुळे मातीचे, पाण्याचे आणि माणसाचे देखील आरोग्य बिघडले आहे. या समस्येवर मात करण्यासाठी आता सर्वसामान्यांनी देखील पर्यावरणाच्या रक्षणाचा, जैविक शेतीचा, भूजलाच्या पुनर्भरणाचा आणि निर्जीव पाणी सजीव करण्याचा उपायांचा अंगिकार करण्याची गरज असल्याचे आवाहन या क्षेत्रात कार्यरत असलेली सामाजिक संस्था (Arvind Kadabe President Olava Foundation)ओलावा फाऊंडेशनचे अध्यक्ष अरविंद कडबे यांनी केले आहे.

एका वाहिनीशी बोलताना कडबे यांनी या समस्येवर व त्यावरील उपायांवर प्रकाश टाकला. कडबे म्हणाले, आमच्या देशात पूर्वी बारमाही नद्या वाहत होत्या. बर्फाच्छादित प्रदेशातून म्हणजेच हिमालयातून आणि जंगल असलेल्या पर्वतांमधूनही नद्या वहात होत्या. पूर्वी पावसाची झड लागत होती. त्याचे पाणी झाडांमार्फत जमिनीत मुरत होते. ते पाणी बारमाही नद्यांच्या स्वरुपात उपलब्ध व्हायचे. पण, आज विपरित परिस्थिती आहे. धो-धो पाऊस पडतो आहे व हे वातावरणातील प्रदूषणाचे निदर्शक आहे. पूर्वीच्या जैविक शेतीत जमिनीचे आरोग्य सांभाळण्याची ताकद होती. ती जाऊन जमिनीत भरमसाठ रासायनिक खते आणि किटकनाशके टाकल्याने त्याचा मातीवर गंभीर परिणाम झाला. मातीला पूरक ठरणारे गांडुळ देशातून नष्टच झाले. पूर्वी आपल्याकडे आठ महिने पाऊस पडत होता. त्यापैकी चार महिने नियमित पाऊस आणि चार महिने दवाच्या स्वरुपात तो जमिनीत ओल ठेवत होता. गायींची संख्या चांगली होती. त्यांच्यासाठी गायरानाची वेगळी व्यवस्था होती. काही मर्यादित भागात शेती व्हायची. पण आज संपूर्ण भागात शेती करूनही पुरेसे उत्पादन आणि नफा मिळत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जमिनीचा जलस्तर प्रचंड खालावला असून रसायनांच्या वापरामुळे जमिनीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता प्रचंड कमी झाली आहे. पंजाबसारख्या राज्यांमध्ये ९९ टक्के भूजल हे आर्सेनिक झाल्याचे धक्कादायक अहवाल आहेत. आपल्याकडे तुलनेने बरी परिस्थिती आहे. पण, जलस्तर अत्यंत खोल गेला असून नद्या, विहिरी आणि बोअरवेल देखील आटल्या आहेत. पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने पुराची स्थिती निर्माण होते. क्षारयुक्त अन्न व पाण्याचा आमच्या शरीरावर गंभीर परिणाम होत आहे. आमचे अवयव निकामी होत आहेत. शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये क्षार जमा होऊन औषधी घेण्याचे प्रमाण वाढले. आता संकट निर्माण झाल्यावर सरकारचे डोळे उघडले आहेत. २०१४ पासून सेंद्रीय शेतीचा कार्यक्रम सरकारकडून राबविणे सुरु झाले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे गट स्थापन झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पूर्वीचे बियाणे देखील वाचविले आहेत, याकडे कडबे यांनी लक्ष वेधले.

उपाययोजनांबद्दल बोलतान कडबे यांनी सांगितले की, आम्ही (Rain water harvesting)रेन वॉटर हारवेस्टींगपासून सुरुवात केली. जलस्तर वाढविण्यासाठी आपल्या घरातील पाणी घरातच कसे साठवता येईल, यासाठी प्रयत्न केले. अनेकांनी हा प्रयोग केला व चांगले रिझल्ट मिळाले आहेत. अशा ठिकाणांवर पाण्याचा जलस्तर वाढत आहे. सरकार व सामाजिक संस्थांनी हातात हात घेऊन काम सुरु केल्याने जलस्तर वाढायला सुरुवात झाली आहे. घरातील पाणी घरात, शेतातील पाणी शेतात साठवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. मागील २५ वर्षांपासून (IIT scientist Dr. Uday Bhawalkar)आयआयटीचे वैज्ञानिक डॉ. उदय भवाळकर यांच्यासोबत आम्ही पाण्यावर काम करतोय. त्यांनी ४५ वर्षाच्या रिसर्चनंतर बायोसॅनिटायझर तंत्रज्ञान विकसित केले असून त्यातून बायोकॅटालीक तयार केले आहे. त्याचे क्रिस्टल पाण्यात टाकल्यावर पाणी प्राणवायुयुक्त होते. एक प्रकारे त्याचे परिवर्तन हिलींग वॉटरमध्ये किंवा जैविक पाण्यात होते. ते अगदी गंगाजलासारखे होते. या पाण्यात विषाणूंचा विकास होत नाही. त्यात डासांची पैदास होत नाही. अशा प्रकारचे मोठे काम त्यांनी केलेय. आगामी काळात हे तंत्रज्ञान देशासाठी आणि जगासाठी वरदान ठरु शकते, असे कडबे म्हणाले. या तंत्रज्ञानाचा वापर विहिरी, बोअरवेल, तलावांसाठी केल्यास पाण्याची आणि आरोग्याचीही भीषण समस्या दूर होईल, असे नमूद करताना किमान श्रीमंतांनी तरी या तंत्रज्ञानाचा वापर करावा, त्यातून साऱ्यांचा फायदा होईल, असेही ते म्हणाले.