औरंगाबाद : औरंगाबाद शहरात प्रेम प्रकरणातून तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःही जाळून घेणाऱ्या गजानन मुंडे (PhD student sets himself, woman colleague ablaze) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे. गजानन मुंडे हा पीएचडीचा विद्यार्थी होता. सोमवारी दुपारी औरंगाबादमधील गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये सहायक प्राध्यापकाच्या केबीनमध्ये ही घटना घडली होती. ३० वर्षीय गजानन मुंडे हा परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचा रहिवासी होता. तर २८ वर्षीय ही याच संस्थेची माजी विद्यार्थीनी दोघेही पीएचडी करीत होते. तिने लग्नाचा प्रस्ताव फेटाळल्याने वेडापिसा झालेल्या गजाननने रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी गजाननचे आई वडील देखील पीडित मुलीला लग्नासाठी धमकी देत असल्याचे समोर आले असून बेगमपुरा पोलीस ठाण्यात मृत गजानन आणि त्याच्या आई-वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी माहिती दिली की, पीडित तरुणी आणि गजानन यांचे प्रेम प्रकरण होते. मात्र गजानन तरुणीकडे लग्नासाठी तगादा लावत होता, तर तिचा लग्नाला विरोध होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये जोरदार वाद सुरु होते. काल तरुणी प्राध्यापकांच्या कॅबिनमध्ये गेली असता गजाननने दोन बाटल्यांमध्ये पेट्रोल भरुन आणले. त्याने कक्षाचा दरवाजा आतून बंद केला. तरुणी आणि स्वतःच्या अंगावर त्याने पेट्रोल ओतून घेतले. त्यानंतर लायटरच्या सहाय्याने पेटवून घेतले मोठा भडका उडताच गजाननने तरुणीला मिठी मारली. संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी दोघांच्या किंकाळ्या ऐकल्यावर दरवाजा तोडून अग्निशमक सिलिंडरच्या साह्याने आग विझवत पोलिसांच्या मदतीने त्यांना घाटी रुग्णालयात हलविले. दोघेही गंभीररित्या भाजले होते. दोघांवर उपचार सुरु असताना मध्यरात्रीच्या सुमारास गजानन मरण पावला. तर युवतीची अद्यापही मृत्यूशी झुंज सुरु असून ती ५५ टक्के भाजल्याची माहिती आहे. दरम्यान, या घटनेमुळे विद्यापीठ आणि शासकीय विज्ञान संस्थेत खळबळ उडाली आहे. आई वडिलांवर गुन्हा दाखल दरम्यान, तरुणीच्या नातेवाईकांचे बयाण पोलिसांनी नोंदवून घेतले. त्यात त्यांनी गजाननसह त्याचे आई-वडील देखील तिला लग्नासाठी सारखे धमाकावत होते व लग्न न केल्यास आम्ही दोघेही जीव देऊ अशा धमक्या देखील देत होते, असे पोलिसांनी सांगितले.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा