सीमावादावर सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करा-उद्धव ठाकरे

0

नागपूर : महाराष्ट्र-कर्नाटक हा सीमावाद कर्नाटककडून पुन्हा एकदा चिघळविण्यात आला असून आपल्या डोळ्यादेखत तेथील मराठी ठसा पुसला जाईल आणि तो पुसला जाऊ नये, यासाठी राज्य सरकारने एक पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करावी, अशी सूचना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी प्रसार माध्यमांशी बोलताना केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, गृहमंत्री अमित शहा आणि आपल्या उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर देखील त्यांनी ठराव मांडला. त्या ठरावामध्ये एक इंचसुद्धा जमीन आम्ही महाराष्ट्राला देणार नाही, अशा कौरवी थाटाचा प्रस्ताव त्यांनी मांडला. आम्ही सरकारचे अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की निदान तिथल्या सीमा भागातील जे अन्यायग्रस्त मराठी भाषिक, आपल्या माता भगिनी आणि बांधव आहेत, त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत. त्याला आमचा पाठिंबा आहे. पाठिंबा दिल्यानंतर काही गोष्टी ज्या आम्हाला सुचवावयाच्या वाटतात, त्या सभागृहातही सुचवणार आहोत, असे ठाकरे म्हणाले.


या राज्यातील योजनांची त्या राज्यामध्ये अंमलबजावणी होते का? निदान त्या लोकांना योजना आणि त्या योजनांतर्गत जे काही लाभ आहे ते आपण देऊ शकणार आहोत की मूळ मुद्दा बाजूलाच असेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुळ मुद्दा हा योजनांसाठी नाही तर भाषिक अत्याचाराबद्दल आपण काय करणार आहोत, हा मुद्दा आहे. परंतु, तो केंद्रशासित करता येणार नाही, ती परिस्थिती तशीच्या तशी ठेवावी असे काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते.


अत्यंत आक्रमकपणाने कर्नाटक सरकार एक-एक पाऊल पुढे टाकत चाललेले आहे. आपल्या डोळ्यादेखत तिथला मराठी ठसा पुसला जाईल आणि तो पुसला जाऊ नये यासाठी एक पुनर्विचार याचिका आपल्या सरकारकडून तातडीने सर्वोच्च न्यायालयात दाखल होण्याची गरज आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत हा संपूर्ण भूभाग केंद्रशासित करण्याचा आग्रह आपण केला पाहिजे.
त्यांनीच तोंडाला काळे फासण्याची वेळ-ठाकरे
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामिन मिळण्याची शक्यता आहे, याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ठाकरे म्हणाले, माझ्या बाजुला संयय राऊत उभे आहेत. त्यांना कोणतेही कारण नसताना तुरुंगात पाठविले. ज्या लोकांनी तुरुंगात पाठविले त्यांना आता आपल्याच तोंडाला काळे फासण्याची वेळ आलीये, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा