नागपूर. समृद्धी महामार्गाच्या बांधकामादरम्यान कंत्राटदारांच्या वाहनांची वाहतूक असलेल्या परिसरातील शेती पिकांचे धुळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी २८ शेतकऱ्यांना १० लाख ५३ हजार ५३५ रुपयांची भरपाई कंत्राटदारामार्फत अदा करण्यात आली आहे. याबाबत शेतकऱ्यांचे अन्य प्रश्न सोडविण्यासाठी विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत सांगितले.
विधानसभेत सदस्य दादाराव केचे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता, त्यावेळी मंत्री श्री. देसाई बोलत होते. त्यांनी सांगितले, की उपविभागीय अधिकारी, आर्वी यांच्यामार्फत कळविण्यात न आलेल्या, ईपीसी कंत्राटदाराने त्यांच्या पातळीवर चार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची भरपाई अदा करण्यात आली आहे. प्रमाणित नुकसान भरपाईच्या मोबदल्याची खबरदारी म्हणून कंत्राटदाराच्या माहे ऑक्टोबर २०२१ च्या देयकातून दहा लाख रुपयांचा निधी रोखण्यात आला आहे. या महामार्गाच्या संरक्षण भिंतीमुळे भिंतीलगतच्या शेतात पाणी साचू नये म्हणून संरक्षण भिंतीलगत आवश्यक तेथे पाणी प्रवाह सुरळीत करण्यासाठी नाली देण्यात आली आहे. संरक्षण भिंतीमुळे पावसाचे पाणी शेतात जमा होत असल्यास त्या पाण्यास संरक्षण भिंतीखालून मार्ग काढून महामार्गाच्या हद्दीत येवू देण्याच्या सूचना संबंधित शेतकऱ्यांना ईपीसी कंत्राटदारांमार्फत देण्यात आल्या आहेत असे देसाई यांनी सांगितले.