(Former Minister Vijay Wadettiwar)तलवारीसोबत उद्योगही महाराष्ट्रात आणा- विजय वडेट्टीवार

0

चंद्रपूर: छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी संपर्क साधला जाणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. मात्र, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आता याही मुद्यावर राजकारण सुरु केले आहे. मुनगंटीवार यांच्या या भूमिकेवर माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार (Former Minister Vijay Wadettiwar) यांनी त्यांना चिमटा काढत तलवारीसोबत उद्योगही आणा असा खोचक सल्ला दिला आहे. त्यामुळे या मुद्यावर पुन्हा एकदा राजकारण सुरु होईल, असे दिसत आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, जगदंबा तलवार परत येत असेल तर आम्हालाही आनंद होईल. मात्र महाराष्ट्रातील उद्योग बाहेर गेल्याने हजारो बेरोजगारांचे हातचे काम गेले आहे. महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. तलवार आणत असताना राज्य सरकारने तलवारी सोबत उद्योगही आणावे. बेरोजगाराच्या हातांना काम मिळणे हे ही तेवढेच महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. उद्योग गेलेत, रोजगार बुडालेत, महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाले. तो विषय बाजूला ठेवून केवळ भावनेचे राजकारण करण्यासाठी जगदंबा तलवारीच्या विषय पुढे केला. तुमचे राजकारण महाराष्ट्रातील तरुणांना कळत आहे. तलवारी सोबत उद्योग जर आणलेत तर जनता तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवील, असेही ते म्हणाले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा