दिल्लीत माजी आमदारास ह्रदयविकाराचा झटका

0

नवी दिल्ली: कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन जाधव हे यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी होते. जाधव यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले. जाधव यांनी नुकताच बीआरएस पक्षात प्रवेश केला होता.
विशेष म्हणजे हर्षवर्धन जाधव यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपली प्रकृती बिघडल्याची माहिती दिली. व्हिडिओमध्ये ते म्हणाले की, भारत माता की जय, देशाची काळजी घ्या महाराष्ट्राची काळजी घ्या. कन्नड सोयगाव मतदार संघाची काळजी घ्या. मी गडकरी साहेबांकडे आहे. मला बहुतेक हार्ट अटॅक आलेला आहे. माझी अँजिओप्लास्टी झालेली आहे. आता मला शासनाच्या गाडीने रुग्णालयात घेऊन जात आहेत, असे त्यांनी व्हीडिओत म्हटले आहे.
हर्षवर्धन जाधव हे मनसेत असताना प्रथम आमदार झाले होते. पक्षांतर्गत वादामुळे त्यांनी मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी निवडणूकही जिंकली होती. मात्र, तिथेही ते फार काळ टिकले नाही. शिवसेनेची साथ सोडल्यानंतर त्यांनी स्वत:चा एक पक्षही स्थापन केला होता. मात्र, अलिकडेच त्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे.