
बालाघाट : सुरक्षा दलाचा दबाव वाढल्याने नक्षली आपले छत्तीसगडच्या अबुझमाडमधील मुख्यालय मध्य प्रदेशात हलविण्याच्या प्रयत्नात असून, काही सैन्य (कॉम्रेड) मध्यप्रदेशात हलविले आहे. नक्षल्यांच्या या बालाघाट जिल्ह्यातील ठाणे गढीच्या सूपखार वनपरिक्षेत्राच्या रोंडा फॉरेस्ट कॅम्पजवळील तळावर हॉकफोर्स आणि बालाघाट जिल्हा पोलीस दलाच्या जवानांनी हल्लाबोल करून, १४-१४ लाखांचे बक्षीस चार महिला नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. हा नक्षल्यांना मोठा धक्का असून, सुरक्षा जवानांच्या सतर्कतेमुळे त्यांच्या मनसुब्यांना सुरुंग लावण्यात आला आहे. ही घटना बुधवार दि. १९ फेब्रुवारी रोजी घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मारल्या गेलेल्या ४ महिला नक्षलवाद्यांकडून एक इन्सास रायफल, एक एसएलआर रायफल आणि एक ३०३ रायफल आणि दैनंदिन वापरातील इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहे. ठार करण्यात आलेल्या चार महिला नक्षलवाद्या भोरमदेव एरिया कमेटीची कमांडर आशा रा. दक्षिण बस्तर जिल्हा सुकमा छत्तीसगढ, भोरमदेव एरिया कमेटीची सदस्य शीला उर्फ पद्मा उर्फ सरिता रा. पेंटा / जगरगुंडा जिल्हा सुकमा छत्तीसगढ, भोरमदेव एरिया कमेटीची सदस्य रंजिता रा. जिल्हा कोंडगाव छत्तीसगड, भोरमदेव एरिया कमेटीची सदस्य लख्खे मडावी जिल्हा सुकमा छत्तीसगढ अशी या चकमकीत ठार झालेल्या महिला नक्षलवाद्यांची नावे आहेत. त्यांच्यावर प्रत्येकी १४ लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले होते.
छत्तीसगड आणि महाराष्ट्रामध्ये सुरक्षा दलाचा दबाव वाढला असून, पोलीस चकमकीत बऱ्याच नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. यामुळे नक्षली अबुझमाड येथील मुख्यालय महाराष्ट्र-छत्तीसगड सिमेलगतच्या मध्यप्रदेशातील जंगलात हलविण्याच्या प्रयत्नात आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक समस्यांच्या माध्यमातून जनसमर्थन मिळविण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहे. या उद्देशाने मृत महिला नक्षली व त्यांच्या काही साथीदारांना दोन वर्षापूर्वीच मध्य प्रदेशात हलविण्यात आले असल्याचे समजते.
बालाघाट जिल्ह्यातील ठाणे गढीच्या सूपखार वनपरिक्षेत्राच्या रोंडा फॉरेस्ट कॅम्पजवळ नक्षल्यांनी बुधवारी एका कँपचे आयोजन केले होते. यासाठी गावातील दुकानातून तांदूळ व इतर साहित्य घेऊन गेले होते. कॅम्प दुपारी होता. यासाठी ठिक-ठिकाणी असलेले नक्षली गोळा होणार होते. नक्षल्यांसाठी गावातून मोठ्या प्रमाणात साहित्य नेण्यात आले असून, तेथे त्यांचा कँप आहे, अशी माहिती बालाघाट पोलिसांना मिळाली. यावरून हॉकफोर्स व बालाघाट पोलिसांनी संयुक्तरीत्या जंगलात नक्षल्यांची शोध मोहीम सुरू केली. दरम्यान पोलिसांना पाहून नक्षल्यांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्याला पोलिसांनी जबर प्रत्युत्तर दिले. यात चार महिल नक्षली ठार झाल्या तर
काही महिला नक्षलवादी जखमी झाल्या आहेत. चकमकीनंतर घनदाट जंगलाचा फायदा घेऊन काही नक्षली पळून गेल्याचे सांगण्यात आले. त्यांचा शोध घेण्यासाठी १२ पोलीस पथकातील ५०० हून अधिक पोलीस बळ अजूनही हॉकफोर्स, सीआरपीएफ कोब्रा आणि बालाघाट जिल्हा पोलीस दलाच्या पथकांकडून जखमी नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी जंगलात शोध घेण्यात येत आहे.
बालाघाट जिल्ह्यातून नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी नक्षलविरोधी मोहिमेत अधिक गतिमानता आणून लवकरच जिल्ह्यातून नक्षलवादाचा समूळ उच्चाटन करण्यासाठी बालाघाट जिल्हा पोलीस आपल्या सहकारी पथकांसह तत्पर असल्याची माहिती बालाघाट जिल्हा पोलीस अधीक्षक नागेंद्र सिंग यांनी गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय बालाघाट येथे घेण्यात आलेल्या पत्र परिषदेत दिली.
——–