Ganesha Kund रहस्यमयी गणेश कुंड बारव

0
वेळा हरिश्चंद्र येथील ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित
नागपूर. शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अमरावती-जबलपूर मार्गावरील वेळा-हरिश्चंाद्र गावाच्या (Vela Harishchanrdra village) परिसरात प्राचीन दगडांपासून बनविलेली पायविहीर आहे. गणेशकुंड बारव (Ganeshkund) नावाने ती ओळखली जाते. ही विहीर प्राचीन स्थापत्यकलेचे उत्कृष्ट आणि जिवंत उदाहरण (well is an excellent and living example of ancient architecture) आहे. प्राचीन रेखीव काम आणि त्यावर देवी-देवतांचे कोरीव काम असलेल्या ऐतिहासिक विहिरीला एक मोठा इतिहास असल्याचे जुने-जाणते लोक सांगतात. आता या ऐतिहासिक वास्तूला विकासाची आणि सौंदर्यीकरणाची “तहान’ लागलेली आहे. विहिरीची तहान वेळीच भागविल्या न गेल्यास सुमारे 400 वर्षे जुना ऐतिहासिक वारसा लवकरच इतिहासजमा झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रासारखा ज्वलंत इतिहास व ऐतिहासिक वारसा क्वचितच कुठल्या राज्याला लाभला असेल. परदेशात ऐतिहासिक स्थळ अप्रतिमरित्या सांभाळली जातात, अडगळ नाहीशी केली जाते. परंतु, आपल्याकडे अडगळ जपून ठेवत ऐतिहासिक वारसा वाऱ्यावर सोडला जातो, ही शोकांतीकाच. या ऐतिहासिक “पायविहीर’ अर्थात गणेश कुंड बारवचा पुरातन वारसा जतन, व्हावा अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
अंदाजे 25 फूट खोल असलेल्या विहीरमध्ये उतरण्यासाठी जवळपास 50 पायऱ्या आहेत. याच विहिरीतून परिसरातील शेतीला मोटीच्या साहाय्याने पाणी दिल्या जात असल्याचे गावकरी सांगतात. काही वर्षांपूर्वी परिसरातील आजूबाजूला असलेल्या कित्येक गावांची तहान हीच विहीर भागवित होती. आता मात्र उतरती कळा आली आहे. ऐतिहासिक बाहुली विहिरीला सध्या अवकळा आलेली आहे. विहिरीवरील दारे, खिडक्या् तुटल्या असून, भिंती मोडकळीस आलेल्या आहेत. आज विहिरीच्या परिसरातील प्राचीन दगड आणि कित्येक वस्तू चोरीला जाण्यास सुरुवात झाली आहे. विहीर आज पूर्णपणे गढूळ पाण्याबरोबरच प्लॅस्टिक, आजूबाजूचा कचरा, निर्माल्याने भरलेली असल्याने विहिरीची दुरवस्था झाली आहे. या बाहुली विहिरीला सध्या विकासाची आणि सौंदर्यीकरणाची गरज आहे. प्रशासनाद्वारा वेळीच दखल घेऊन विहीर व परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केल्यास या ऐतिहासिक वारशाचे अस्तित्व कायम राहू शकेल आणि येणाऱ्या पिढ्यांना तो आपल्या डोळ्यांनी बघता येऊ शकेल.
शहरापासून हाकेच्या अंतरावर एकांत मिळत असल्याने या परिसरात दिवसेंदिवस जोडप्यांचा सुळसुळाट वाढलेला आहे. दुचाकी व चारचाकी वाहनात पाण्याच्या बॉटल्स, प्लॅस्टिकचे ग्लास आणि दारूच्या बाटल्या आणून सकाळपासूनच इथे काही मद्यपी खास दारू पिण्यासाठी आणि सिगारेट ओढण्यासाठी जमा होतात. विहीर परिसरात कुठेही नजर टाकल्यास रिकाम्या दारूच्या बाटल्या, पाण्याच्या बॉटल्स व सिगारेटच्या पाकिटांचा खच आढळून येतो.
    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा