चंद्रपूरमधून महायुतीच्या महाप्रवाहाचा एल्गार होऊ द्या – ना.सुधीर मुनगंटीवार

0

 

चंद्रपूरमध्ये महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा

चंद्रपूर CHNDRAPUR – महायुतीच्या संमेलनात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय हे चारही पक्ष एकत्र आले आहेत. आपण सारे केवळ भाषण देण्यासाठी नव्हे तर महायुतीच्या महाप्रवाहाचा एल्गार करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आपल्या एकजुटीचा आदर्श महाराष्ट्रात निर्माण करण्याचा निर्धार करण्यासाठी एकत्र आलोय. आमदार, खासदार, मंत्री कुणीही झाले तरीही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र अध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्टीने पुढे गेला पाहिजे, हा उद्देश ठेवून पुढे मार्गक्रमण करावे, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar यांनी आज (रविवार) येथे केले.

चंद्रपूर जिल्ह्यातील महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा रविवारी आयोजित करण्यात आला. यावेळी ना. श्री. मुनगंटीवार बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, लोकसभा निवडणुक प्रमुख प्रमोद कडू, महायुती समन्वय प्रमुख देवराव भोंगळे, शिवसेना जिल्हाध्यक्ष बंडू हजारे, शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन मत्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजीव कक्कड, आरपीआय (आठवले गट) जिल्हाध्यक्ष गौतम तोडे, आरपीआय (आठवले गट) ग्रामीण अध्यक्ष जयप्रकाश कांबळे, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे हरी दुर्योधन, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव आबिद अली, भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंग चंदेल, ब्रह्मपुरी विधानसभा प्रमुख अतुल देशकर, वरोरा विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर, लोकसभा विस्तारक रवी बेलूरकर, भाजप नेते अशोक जिवतोडे, माजी महानगर जिल्हाध्यक्ष मंगेश गुलवाडे, भाजप नेते रामपाल सिंग, माजी महापौर राखीताई कंचर्लावार, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, माजी आमदार संजय धोटे, सुदर्शन निमकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘महाराष्ट्रात शिंदेंचा एस, फडणविसांचा एफ, पवारांचा पी… म्हणजे सुपर फास्ट प्रोग्रेस काम करत आहे. आपण महाराष्ट्राचा विकास व्हावा म्हणून एकत्र आलोय. महायुतीमधील प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी आज एका वैचारिक भावनेतून एक स्वर, एक लक्ष्य अशी भूमिका मांडली. आपण विविध पक्षांचे असलो तरीही हीच भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे.’ समन्वय समितीचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या समन्वय समितीचा मी देखील सदस्य आहे. समितीच्या बैठकीत मी जिल्हास्तरीय एकत्रीकरणासाठी आग्रही होतो. आज महाराष्ट्रात एकाच दिवशी महायुती एकत्र येत आहे, याचा आनंद होत आहे. एक सूर, एक लक्ष्य आणि एक दिशा हा भाव ठेवावा लागेल. त्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय समिती नेमण्याची गरज आहे. यासोबतच युवकांची आणि महिलांचीही समन्वय समिती स्वतंत्र असायला हवी. विधानसभानिहाय एकरुपता यावी म्हणून ६ विधानसभांच्या तारखा निश्चित करून नियोजन आवश्यक आहे.’ चंद्रपूरमध्ये महायुतीच्या वतीने महिलांना एकत्र करून मकरसंक्रांतीचा उत्सव साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

राहुल गांधी आले तरीही…

काँग्रेसचे लोक किंवा इतर विरोधी राजकीय पक्षांचे जेवढे लोक शिल्लक आहेत, त्यांच्याविरोधात एकजुटीने लढण्याची गरज आहे. ही एकजूटता दाखवली तर राहुल गांधी चंद्रपूरमध्ये मुक्काम करून बसले तरीही काँग्रेसला जागा जिंकता येणार नाही, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. राहुल गांधी जेथे जातात तेथे काँग्रेसचा उमेदवार पराभूत होतो, ही बाब लक्षात ठेवण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

हमारा बुथ सबसे मजबुत

महायुतीमध्ये प्रत्येक पक्ष वेगळ्या विचारांचा आहे, पण दिशा एकच आहे. त्यामुळे एखाद्या प्रसंगाला एकमेकांचा राग आला तरीही तो महायुतीवर किंवा आपल्या पक्षावर काढायचा नाही, असा निर्धार करा. आपल्याला एकत्र येऊन समन्वय ठेवायचा आहे. ‘हमारा बुथ सबसे मजबुत’ हा भाव ठेवून काम करा. त्यासाठी जिल्ह्यामध्ये पक्षप्रवेश वाढविण्याची गरज आहे. आपला पक्ष आणि महायुती मर्यादित ठेवू नका. प्रत्येकाने विकासाची गाडी धावत राहील यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

विरोधकांकडे विकासाचा जाहीरनामाच नाही

महायुतीला महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकायच्या आहेत. विरोधी पक्षाकडे कुठलाही विचार नाही आणि विकासाचा जाहीरनामा नाही. सोशल मीडियावरील त्यांच्या विषारी प्रचाराला सत्यावर आधारित उत्तर देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

योजना लोकांपर्यंत पोहोचवा

केंद्र व राज्य सरकारच्या विकासाच्या अनेक योजना आहेत. राज्यातील असो वा जिल्ह्यातील योजना असो, त्या लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

महायुतीच्या एकजुटीचा आदर्श

चंद्रपूर जिल्हा महायुतीच्या बाबतीत समन्वयामध्ये आदर्श ठरेल आणि इतर जिल्ह्यांना आपल्याकडून आदर्श घ्यावा लागेल, असे काम आपल्याला करायचे आहे, असा निर्धार करण्याचे आवाहन करतानाच चंद्रपूर जिल्ह्यात जिवतीपासून ब्रह्मपुरीपर्यंत महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.