मुंबई-अयोध्येत राम मंदिराचे प्राथमिक बांधकाम पूर्ण झाले असून २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाची माहिती पुढे आली आहे. महानायक अमिताभ बच्च यांनी अयोध्येत मोठा भूखंड खरेदी केला असून तेथे ते घर बांधणार असल्याची माहिती आहे. ‘द हाउस ऑफ अभिनंदन लोढा’ यांच्या माध्यमातून त्यांनी हा भूखंड खरेदी केलाय.
यासंदर्भातील वृत्त एका राष्ट्रीय दैनिकाने दिलेय. या दैनिकाच्या माहितीनुसार, या भूखंडाचा आकार सुमारे १० हजार चौरस फुट असून त्याची किंमत १४.५ कोटी रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. भूखंड ‘सेव्हन स्टार मल्टीपर्पज एन्क्लेव्ह – द सरयू’मध्ये आहे. या भूखंडातील गुंतवणुकीबाबत स्वतः अमिताभ बच्चन यांनी माहिती दिली आहे. बच्चन यांनी म्हटले आहे की, “आपल्या हृदयात अयोध्या शहरासाठी विशेष स्थान आहे. ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ यांच्यासह ‘द सरयू’मध्ये घर बांधण्यासाठी मी उत्सुक आहे. अयोध्येतील अध्यात्म आणि सांस्कृतिक समृद्धीने भौगोलिक सीमा ओलांडून एक भावनिक बंध निर्माण केला आहे. अयोध्येत परंपरा आणि आधुनिकता दोन्ही आहे. मी या जागतिक आध्यात्मिक राजधानीत माझे घर बांधण्यास उत्सुक आहे.”
नियोजित राम मंदिरापासून १५ मिनिटांच्या आणि अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ३० मिनिटांच्या अंतरावर हा भूखंड आहे. सरयूचे पहिले नागरिक म्हणून अमिताभ बच्चन यांचे स्वागत करताना आपल्याला आनंद होत असल्याचे अभिनंदन लोढा यांनी म्हटले आहे. या प्रकल्पाचे काम मार्च २०२८पर्यंत पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. राम मंदिर उभारणीच्या घोषणेनंतर अयोध्येत जमिनीच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत. अनेक फाईव्ह स्टार हॉटेलांचे प्रकल्प अयोध्येला सुरु होणार आहेत.