महाकाली पावली ; सोन्यापाठोपाठ प्लॅटिनम, रूथेनियमचेही साठे?
चंद्रपूर. निसर्गाची विदर्भावर विशेष कृपादृष्टी (Special Blessings on Vidarbha) आहे. अनेक ठिकाणी नैसर्गिक सौंदर्याने नटलेला परिसर सर्वांनाच मोहित करणारा ठरतो. ऐवढेच कशाला महागड्या खनिजांचे विपूल साठेही विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्हा (Chandrapur District of Maharashtra ) खनिजे, धातू आणि जीवाश्माने समृद्ध आहे. याच जिल्ह्यात सोन्याची खाण असल्याची बाब दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच सार्वजनिक केली. सध्या या सोन्याच्या खाणीची जिल्हाभर चर्चा आहे. मात्र, बारा वर्षापूर्वी झालेल्या संशोधनात जिल्ह्याच्या भूगर्भात सोन्यापेक्षाही मौल्यवान असलेले प्लॅटिनम, दुर्मिळातील दुर्मिळ म्हणून ओळखले जाणारे रूथेनियम (Platinum, Ruthenium), रोडीयम आणि इरेडियम धातू जिल्ह्याचा भूगर्भात पुरेशा प्रमाणात असल्याचे संशोधन झाले होते. भूगर्भात दफन असलेल्या या मौल्यवान धातूंना बाहेर काढण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू झाली नसली तरी चंद्रपूरला सोन्याचे दिवस येतील आणि भविष्य सोन्याहूनही पिवळे असेल, असे चित्र चंद्रपूरकर रंगवू लागले आहेत.
तीन वर्षे भूगर्भ शास्त्रज्ञांकडून संशोधन
वरिष्ठ भूगर्भ शास्त्रज्ञ एम. एल. डोरा, शास्त्रज्ञ के. के. के. नायर, के. शशीधरण यांनी त्यांच्या संशोधनावरचा शोधनिबंध बंगळूरु येथून प्रकाशित होणाऱ्या “करंट सायन्स’ या नियतकालिकात प्रकाशित केला होता. या संशोधनात चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी आणि वटराणा गावादरम्यानच्या पट्ट्यात प्रामुख्याने पॉयरोझिनाईट आणि गॅब्रो हे प्लॅटिनमचे, तर पेंटालॅंडाईट हे सोन्याचे संयुग आढळून आले. पॉयरोझिनाईट आणि गॅब्रो या संयुगात प्लॅटिनमचे 89 ते 135 पीपीबी इतके, तर पेंटालॅंडाईट या संयुगात सोन्याचे 0.22 टक्के इतके प्रमाण आढळले. याशिवाय कोबाल्टचे प्रमाण 72 ते 100 पीपीएम इतके आढळले. सोने आणि प्लॅटिनम असलेल्या खनिजांचे पट्टे एक ते दहा किलोमीटर लांब आणि एक मीटर ते 10 मीटर रुंद असल्याचे शास्त्रज्ञांनी शोधनिबंधात म्हटले आहे. परिसरातील खनिजात लोह, तांबे आणि निकेलचे प्रमाण 29 ते 59 टक्के इतके आढळले होते.देशभरात प्लॅटिनमची खनिजे अत्यल्प असून, परदेशातून आयात करूनच या खनिजांची गरज भागविली जाते. त्यामुळे गोंडपिंपरी येथील संशोधनाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. या संशोधनाला बारा वर्षांचा काळ उलटला असला तरी दुर्मिळ धातूंना बाहेर काढण्याचा प्रक्रियेवर कुठलीच हालचाल अद्याप झालेली नाही.