
गोंदिया 03 फेब्रुवारी : तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तलावांवर हिवाळ्याची चाहूल लागताच परदेशी पक्ष्यांचे आगमन व्हायला सुरवात झाली आहे. यात अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या माहुरकुडा तलावावर ”रेड क्रेस्टेड पोचार्ड” या स्थलांतरित पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले असून हे विदेशी पक्षी ,पक्षीमित्र व अभ्यासकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात तलाव असून या तलावांवर मोठ्या प्रमाणात जैव विविधता टिकून असल्याने पक्ष्यांनसाठी खाद्य सामुग्री मोठ्या प्रमाणात टिकून आहे . त्यामुळे दरवर्षी हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात विदेशी पक्षी या ठिकाणी दाखल होतात. मात्र माहुरकुडाचा तलाव या बाबतीत उपेक्षित होता. दरवर्षी येथे स्थलांतरित पक्षी हजेरी लावत नव्हते. मात्र या वर्षी पहिल्यांदाच विदेशी पक्ष्यांनी मोठ्या प्रमाणात या तलावावर हजेरी लावली आहे. या तलावावर विदेशी पाण पक्ष्यांचा वावर व किलबिलाट हे पक्षी निरीक्षण , पक्षी प्रेमींचे लक्ष वेधणारे आहे. माहुरकुडाच्या तलावावर पहिल्यांदाच एका विशिष्ट प्रजातीची मुबलक प्रमाणात संख्या थक्क करणारी असून या ठिकाणी अंदाजे ४०० ते ५०० रेड क्रेस्टेड पोचार्ड पक्षी गेल्या आठ दिवसा पासून मुक्कामी आले आहेत. मागील १५ वर्षांच्या संख्येची बेरीज केली तरी यावर्षी जेवढे पक्षी आले आहेत त्यापेक्षा जास्त पक्षी या वर्षी एकाच तलावावर आले अशा पक्षी अभ्यासकांचा अंदाज आहे . या तलावापासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर बुटाई तलाव आहे.त्या ठिकाणी दरवर्षी ग्रेलेग गूज, रेड क्रेस्टेड पोचार्ड, कॉमन पोचार्ड, युरेशियन पिन टेल, कॉमन कुट व इतर प्रजातीचे स्थानिक व स्थलांतरीत पाण पक्षी सध्या या तलावावर पाह्यला मिळत आहे.
तर विशेष बाब म्हणजे परदेशात या दिवसात बर्फ वृष्टी होत असल्याने त्या ठिकाणी असलेल्या पक्ष्यांना धोका निर्माण होत असल्याने तेथील पक्षी हजारो किलोमीटरचा नंतर ओलांडून काही महिन्या करिता महाराष्ट्रा सह इतर राज्यात स्थलांतरित होऊन थंडीचा जोर कमी होताच पुन्हा आपल्या दिशेने निघून जातात तर परदेशी पक्षी आपल्या जिल्यात आल्याने पक्षी अभ्यासकांसाठी ही पर्वणीच असते.