नागपुरात डबल मर्डर, सख्ख्या भावांकडून दोघा मित्रांची हत्या

0

नागपूर : नवनियुक्त पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी गुरुवारीच पदभार स्वीकारला. त्यानंतर अगदी काही तासांतच त्यांना शहरातील गुन्हेगारांकडून रक्तरंजित सलामी मिळाली आहे. वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन मित्रांची हत्या करण्यात आली. पैशांच्या वादातून गुरुवारी रात्री उशिरा ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सनी धनंजय सरुडकर (३३, जलालपुरा, गांधीबाग) व कृष्णकांत भट (२४, नंदनवन) अशी मृतकांची नावे आहेत. ते दोघेही मित्र होते. ते दोघे मिळून फायनान्सचे काम करायचे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी आरोपी किरण शेंडे (३०, साईबाबानगर) व योगेश शेंडे (२५, साईबाबानगर) यांना कर्जाने पैसे दिले होते. आरोपी सख्खे भाऊ आहेत. एका मोटर डीलरकडे ते काम करतात. आरोपींनी सनी व कृष्णकांत यांच्याकडून पैसे घेतले. या पैशांची परतफेड ही हप्तेवारीने होणार असल्याचे ठरले होते. मात्र, काही कालावधीने हाप्ते देणे बंद केले. त्यामुळे किरण, योगेश व सनी, कृष्णकांत यांच्यात वाद झाला. सनी व कृष्णकांत यांनी दोन्ही भावांकडे पैशासाठी तगादा लावला. मात्र, ते सातत्याने टाळाटाळ करीत असत.

 

 

अशात दोन्ही भावांनी चर्चेसाठी गुरुवारी रात्री कृष्णकांत व सनीला साईबाबानगर येथील घरी बोलावले. चर्चेदरम्यान सनी व कृष्णकांत यांनी पैशासाठी आग्रही भूमिका घेतली. यावेळी या प्रकरणातील तिसरा आरोपी विक्की राजकुमार कोहळे आणि अन्य एक अल्पवयीन मुलगासुद्धा शेंडे बंधूंसोबत उपस्थित होता. वाद वाढल्यानंतर थोड्याच वेळात हाणामारी सुरू झाली. किरण, योगेश, विक्की व अल्पवयीन मुलगा अशा चौघांनीही सनी व कृष्णकांत यांच्यावर राफ्टरने वार केले. यात दोघे खाली कोसळले. त्यानंतरही ते चौघे सनी व कृष्णकांतच्या डोक्यावर प्रहार करतच होते. दोघांना रक्ताच्या थारोळ्यात सोडून चौघेही घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेत दोघेही मृत पावले.