मुंबईः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हा होणार, यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. निवडणुकाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन असून त्यावर होणारी सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर (Hearing on Local body elections in SC) पडल्याने पावसाळ्यापुर्वी निवडणुका होण्याची शक्यता संपुष्टात आली असून आता निवडणुका हिवाळ्यातच होतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षण आणि वॉर्डरचनाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हरकत घेण्यात आली होती. त्यामुळे निवडणुकांना स्थगिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यापूर्वी कोरोनामुळे रखडल्या. त्यानंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा उपस्थित होऊन निवडणुका लांबणीवर पडल्या. अशातच राज्यातल्या सत्तासंघर्षाचाही त्यावर परिणाम झाला.
स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतच्या याचिकेवर सात फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार होती. मात्र, ती झाली नाही. त्यानंतर 21 मार्चची तारीख देण्यात आली. हे प्रकरण लवकर ऐकून घेऊ, असे सरन्यायाधीशांनी सांगितले. मात्र, पुन्हा 14 मार्चची तारीख दिली, पण आज या याचिकेची नोंदही घेण्यात आली नाही. त्यामुळे ही सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. आता सत्तासंघर्षाच्या सुनावणीनंतर यावर सुनावणी होऊ शकते. कदाचित 16 मार्चनंतरच या सुनावणीसाठी मुहूर्त लागेल, असे समजते. मात्र, निर्णय होत नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थाचा कारभार प्रशासकांकडे आहे.