“आज त्याचा जन्मदिन: एका कोहिनूराचे स्मरण”: डॉ. प्रसाद पिंपळखरे

0
"आज त्याचा जन्मदिन: एका कोहिनूराचे स्मरण"

 

दिलीप, राज, देव चित्रपटसृष्टीचे त्रिदेव, अनभिषिक्त सम्राट, झगमगणारे सितारे शेवटचा तारा अलीकडेच निखळला आणि खऱ्या अर्थाने एका युगाचा अस्त झाला. ‘राज’ चा चेहेरा हा “common man” चा, ‘देव’ म्हणजे “सदाबहार तारुण्य” तर ‘दिलीप’ त्या सर्वकालीन निरंतर अश्या “tragedy चा धनी”! तिघांनी आपले सुपे, परगणे, जिल्हे राज्य वाटून घेतलेली. तिघांच्या मैत्रीचे किस्से मशहूर…इतके की ‘प्रेमरोग’ च्या वेळेला राज ऋषीला ओरडून म्हणाला ‘मुझे युसुफ चाहीये’ म्हणजे दिलीप च्या डोळ्यातली आर्तता, आर्जव, आवाहन, आतुरता पाहिजे. ती होतीच त्याच्या डोळ्यात, त्याचा मुद्राभिनय जिवंत होता, देहबोली अत्यंत आश्वासक होती. नाटकी अभिनयाला बाजूला सारून वास्तविक अभिनय चित्रपटाला देणारे मोतीलाल आणि दिलीपकुमार! दिलीपची आणि मधुबालाची chemistry काय होती हे कळायचे असेल तर ‘संगदिल’ मधलं ‘दिल मे समा गये सजन’ बघा. ‘मुगले आझम’ तर काय प्रेमकाव्यच, तो शाही देखावा, बडे गुलाम अली, मधुबाला, दिलीप, नौशाद, के असिफ भरजरी।तसे हे तिघेही आधीच्या पिढीचे.. पण आमच्या पिढीवर ही त्यांचे ‘Matini आयडॉल’ असणे क्रमप्राप्त होते. रेग्युलर शो साठी अमिताभ होता.

ह्या तिघांत माझी उतरती भाजणी देव, राज, दिलीप. त्याचा मी फॅन नक्कीच नाही पण ‘नया दौर’ मधला “शंकर”, ‘आझाद’ मधला “आझाद”, ‘मशाल’ मधला “प्राध्यापक”, ‘विधाता’ त ला “दादू” खरच आवडले होते. ‘मशाल’ मधला पत्नीवियोगाचा प्रसंग काय जिवंत केलाय.. वा!! ‘उडे जब जब झुल्फे’ शोभते त्याला, ‘एक शहेनशहा ने बनवाके हसी ताजमहल’ तो सहज मिरवतो. त्याच्या अभिनयाची ताकत इतकी मोठी की त्याची कितवीतरी नक्कल असलेले राजेंद्रकुमार, मनोजकुमार मान्यता पावतात. त्यांनी केलेला आरशासमोर चा प्रसंग अमिताभ ला ‘अमर अकबर अन्थोनी’ त करावासा वाटतो. असा हा सुवर्णयुगाचा शेवटचा साक्षीदार असलेला हिरा खरं तर हिऱ्यांच्या सरताज कोहिनूर!! इहलोकातील जरी त्याचे अस्तित्व लोप पावले असले तरी त्याच्या अभिनयाचे तेज असंख्य हृदयात चकाकत राहील.. ‘कोहिनूर’ हिऱ्या सारखं!! इंग्लंड च्या राणी कडे पण असाच एक ‘कोहिनूर’ आहे त्याची बोली कधीतरी लावली जाईल पण हा आमचा कोहिनूर अमूल्य होता आणि राहील!!!
अलविदा दिलीपकुमार🌹🙏🏻🌹

डॉ. प्रसाद पिंपळखरे