लखनौः उत्तर प्रदेश शिक्षण मंडळ आणि सीबीएसईचा अभ्यासक्रम (UP educational curriculum) योगी आदित्यनाथ (yogi adityanath) सरकारने बदलला असून आता बारावीच्या विद्यार्थ्यांना मुघलांचा इतिहास शिकवला जाणार (History of Mughals) नाही. भारताचा इतिहास या पुस्तकातून मुघल दरबार हा विषय कमी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश सरकारने अकरावीच्या पुस्तकातून इस्लामचा उदय, संस्कृतींमध्ये झालेले मतभेद, औद्योगिक क्रांती असे धडे हटविले आहेत. आगामी शैक्षणिक सत्रापासून अभ्यासक्रमात हे बदल करण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. नागरिक शास्त्राच्या पुस्तकातून अमेरिकेचं वर्चस्व आणि शीतयुद्ध हे धडे हटवण्यात आले आहेत. यापूर्वी बारावीच्या इतिहासाच्या पुस्तकात भारतीय इतिहास-२ मध्ये शासक ते मुघल दरबार हे धडे होते. ही सगळी प्रकरणे वगळण्यात आली आहेत.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री बृजेश पाठक (Brijesh Pathak ) यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितलं की, आपली संस्कृती हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. नव्या पिढीला आपण हा वारसा काय होता, ते शिकवले पाहिजे. पुरातन काळात लोक कोणत्या संस्कृतीत होते, हा विषय शिकवलाच गेला नाही. त्यामुळे आम्ही मुघलांचा इतिहास वगळून त्याऐवजी हा विषय शिकवणार आहोत. उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयावर समाजवादी पार्टीने टीका केली आहे. भाजप सरकार मुस्लीम समाजाच्या विरोधात जे काही करता येईल ते सगळे करीत आहे. इतिहासातून अभ्यासक्रम वगळून काय होणार? मुघल काळात भारताने खूप प्रगती केली होती. हे कसे विसरता येईल? असा दावाही सपाने केला. सपा नेते नवाब इकबाल मेहमुद म्हणाले की, भाजपाकडून फक्त मतांच्या राजकारणासाठी या गोष्टी केल्या जात आहे. ताजमहाल, लाल किल्ला, कुतुबमिनार यांचा इतिहास फक्त भारतासाठीच मर्यादित नाही तर तो इतिहास सगळ्या जगाला माहित आहे, असेही ते म्हणाले.