मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसमधील महाभूकंपानंतर अजित पवार यांच्या पाठिशी किती आमदारांचे बळ आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धर्माराव अत्राम, धनजंय मुंडे, आदिती तडकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीचे बहुतांशी आमदार आमच्या सोबत असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासह आम्ही सरकारला पाठिंबा दिला असून पक्षाच्या चिन्हावरच पुढील निवडणुका लढवणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले असल्याने अजित पवारांनी संपूर्ण तयारीनिशी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याचे राजकीय निरीक्षकांना वाटते.
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर शरद पवारांना याची कल्पना आहे का असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी आम्हाला पक्षाच्या सर्वच नेत्यांचा आशीर्वाद असल्याचा दावा केला. मात्र, आमदारांचा आकडा जाहीर केलेला नाही. बहुतांशी आमदार आमच्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले. अजूनही मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असून त्यातही इतरांना मंत्रिपदे मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हे चिन्ह आणि नावावरच आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुका लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोदींचं नेतृत्व मजबूत-भुजबळ
दरम्यान, सरकारमध्ये मंत्री म्हणून सहभागी छगन भुजबळांनीही राष्ट्रवादीतील भूकंपावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो असल्याचे सांगितले. . राज्यातील प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला सकारात्मकतेने काम करणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज अतिशय मजबुतीने देशाचे नेतृत्व करीत असून जर मोदीच 2024 मध्ये पंतप्रधान होणार असतील तर आपण त्यांच्यासोबत गेले पाहिजे. आपण सरकारला मदत केली पाहिजे. उगाच रस्त्यावर भांडून प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला, असे भुजबळ म्हणाले.
भ्रष्टाचाराच्या चौकशांमुळे गेल्याचा आरोप होत असला तरी त्यात अजिबात तथ्य नाही. शपथ घेतलेल्या लोकांपैकी अनेकांवर केसेस नाहीत. त्यामुळे उगीच कुणीतरी आमच्यावर आरोप करु नये. आम्ही आमचा निर्णय घेतला आहे. तुम्ही तुमचे काम करा, असा सल्लाही भुजबळांनी यावेळी विरोधकांना दिला