आमदारांना वेतन तरी किती मिळतं? जाणून घ्या धक्कादायक माहिती

0

नागपूरः  राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्यात लोकप्रतिनिधींना मिळणारे वेतन व पेन्शनचा मुद्दा ऐरणीवर आलाय. विधिमंडळाच्या सदस्यांना म्हणजेच आमदारांना वेतन तरी किती मिळतं? याची माहिती घेण्याचा प्रयत्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते संकेत नेवगी केला. त्यातून धक्कादायक माहिती पुढे आली (Salaries and Allowances to MLA, MLC`s in Maharashtra) आहे. विद्यमान आमदारांचे मूळ वेतनच १ लाख ८२ हजाराच्या घरात असून भत्ते व सोयीसुविधा मिळून आमदारांना २ लाख ७१ हजार रुपये इतके निव्वळ वेतन दिले जाते, अशी माहिती महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाकडून देण्यात आलीय. ही आकडेवारी आमदारांना मिळणारे घरभाडे आणि स्वीय सहायकांच्या वेतनापोटी मिळणाऱ्या रकमेच्या व्यतिरिक्त आहे. या खर्चाचा मोठा भार सरकारी तिजोरीवर पडतो.
सध्या राज्यात जुन्या पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीवरून वादंग माजले आहे. या मागणीसाठी राज्य कर्मचारी संपावर गेले आहेत. शिक्षकांचीही तीच मागणी आहे. तर दुसरीकडे सरकारचा आर्थिक भार वाढत असल्याचा दावा सरकारकडून केला जातोय. या परिस्थितीत आमदारांना मिळणारे मिळणारे वेतन व भत्ते किती, याचाही हिशेब काहींनी मागविला आहे. संकेत नेवगी यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत आमदारांच्या वेतन व भत्त्यांची माहिती विचारली होती. त्याला उत्तर देताना विधानमंडळाने वेतन व भत्त्याची आकडेवारी दिली आहे. यात आमदारांचे मूळ वेतन १ लाख ८२ हजाराच्या घरात जाते, असे आढळून आले आहे. याशिवाय महागाई भत्त्यापोटी सुमारे ७० हजार रुपये, ८ हजार रुपये दूरध्वनी सुविधा भत्ता, १० हजार रुपये स्टेशनरी व टपाल सुविधा भत्ता, १० हजार रुपये संगणकचालक सेवा भत्ता असे २ लाख ७१ हजार रुपये इतके आमदारांचे निव्वळ वेतन आहे. या वेतनातून आयकर वजा केला जातो. मात्र, याशिवाय आमदारांना घरभाडे भत्ता तसेच स्वीय सहायकाच्या वेतनाची मोठी रक्कमही मिळते. आमदार माजी झाला की त्याला पेन्शनही मिळते. विशेष म्हणजे एकदा आमदार झाल्यावर पुन्हा निवडून आले नाही तरी माजी आमदारांना पेन्शनचे लाभ मिळत असून दरमहा किमान ५० हजार रुपये पेन्शन माजी आमदारांना दिली जाते व त्यात पाच वर्षानंतर प्रत्येक वर्षी हजार रुपयांची वाढ होत असते. अलिकडेच राज्यातील माजी आमदार तसेच मंत्र्यांना किती पेन्शन मिळते, याची धक्कादायक आकडेवारीच सोशल मिडियावर व्हायरल झाली होती.

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा