संघ दक्ष आणि भारतीय जनता पक्ष

0
vidhansabha-election-bjp
vidhansabha-election-bjp

अलीकडे काही समाजसेवी उत्साहात माझ्याकडे स्मशान भूमीच्या सरंक्षक भिंत बांधकामासाठी वर्गणी मागायला आले असता मी त्यांना फटकारले, जे आत आलेत ते पुन्हा बाहेर न जाण्यासाठी आणि बाहेरच्यांना अजिबात आत येण्याची इच्छा नसते मग सरंक्षक भिंत हवी कशाला, असा सवाल करत मी त्यांना आल्या पावली घालविले. नेमके हे असेच त्या मोदी आणि शाह यांच्यामुळे संघ मुख्यालयाचे झालेले आहे. म्हणजे, भाजपामध्ये संघाची लक्ष घालण्याची लाख इच्छा त्यातून संघातल्या टॉपच्या मंडळींच्या चेहऱ्यावर आलेली अस्वस्थता अगदी उघड दिसते, पण इच्छा असूनही उपयोग शून्य. त्यांनी काही सूचना करण्याचा प्रयत्न केला तरीही काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे संघ परिवार गप्प बसण्याची भूमिका घेतो. त्यातून वाद उफाळून अजिबात वर येत नाहीत. भाजपा आणि संघात एकजूट देखील दिसते, ती वेगळीच. अनेकांनी, विविध अनेक नेत्यांनी, अडवाणी पद्धतीने स्वतःचा एखाद्या घरात अडगळीच्या खोलीत खाटेवर पडलेल्या जक्खड पडीक जर्जरवृद्धासारखी भूमिका, विशेषतः मोदी आणि शाह यांच्यासमोर नक्की घेतलेली आहे. अखंड हिंदुत्व, वरून सतत सत्तेत आणि जगभर नाव… संघाला किंवा भाजपातल्या इतर नेत्यांना आणखी काय हवे? जे नेमके मोदी आणि शाह यांनी त्यांना मिळवून दिल्याने संघ भाजपातल्या इतर साऱ्याच नेत्यांनी राजू श्रीवास्तवाच्या शब्दात जख्खड म्हातारा झालेल्या गब्बरसिंगची भूमिका घेणे अधिक पसंत केलेले आहे…

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका जिंकणे हे मोदी, शाह, संघ आणि भाजपाचे प्रमुख लक्ष्य ध्येय उद्दिष्ट आणि स्वप्न. त्यामुळे काही बाबत अनेकांची अवस्था गुप्तरोग झालेल्या पेशंट सारखी, म्हणजे सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी झालेली असली, तरी 2024 च्या निवडणुकीत मनातली भडास काढण्यास कोणीही तेथे तयार नाही. तयार होणार नाही. मात्र आपल्या या राज्यात, विशेषतः भाजपामध्ये येत्या काही महिन्यात किंवा काही दिवसातच शंभर टक्के भाकरी परतवण्याच्या मोठी हालचाली सुरूहोणार आहेत. उगाच अनेक लोक कंड्या पिकवून मोकळे होताहेत की, फडणवीस उपमुख्यमंत्री पदावरून पाय उत्तर होतील आणि दिल्लीत जातील. पण या बातमीत सध्यातरी अजिबात तथ्य नाही, अर्थ नाही, अशी माझी माहिती सांगते. याऐवजी हेच फडणवीस 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पुण्याऐवजी ईशान्य मुंबईतून लोकसभा लढवतील, नक्की जिंकतील, त्यानंतर ते दिल्लीत निघून जातील. जरी संपूर्ण नागपूरकरांचे एखाद्या प्रेयसीसारखे अगदी मनापासून गडकरी आणि फडणवीस या दोघांवर अतिशय प्रेम असले, तरी याच नागपूरकर मतदारांची इच्छा आणि मानसिकता केवळ नितीन गडकरी यांनाच पुन्हा लोकसभेते पाठवण्याची असल्याने, फडणवीस किंवा अन्य कोणत्याही नावाचा विचार गडकरी ऐवजी करणे म्हणजे भाजपाने आपणहून पायावर धोंडा मारून घेण्यासारखे असल्याने तेथे पुढले खासदार फक्त आणि फक्त नितीन गडकरी हेच असतील…

तिकडे चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार यांना आणि जळगाव जिल्ह्यातील रावेर मधून गिरीश महाजन यांना पुढली लोकसभा नक्की लढवावी हे ठरलेले आहे. आणि महाजन यांची मोठी विवाहित कन्या गिरीश महाजन यांनी मिळविलेल्या मोठ्या लोकप्रियतेतून जामनेर विधान सभा लढवेल आणि पुढली आमदार म्हणून विधान सभेत असेल. पुण्यातून ब्राम्हणांना टाळणे भाजपाला खूप महागात पडलेले असल्याने येणारी विधानसभा चंद्रकांत पाटील पुण्यातून लढवणार नाहीत. त्यांच्या ऐवजी पुन्हा एकवार मेधा कुलकर्णीं यांनाच उमेदवारी देण्यात येईल. किंबहुना यावेळी मेधा कुलकर्णी जरी विधान सभेत नव्हत्या, तरीही त्या अजिबात क्षणभर न थांबता कल्याणमधल्या त्या नरेंद्र पवार पद्धतीने अगदी एखाद्याला लाजेने मान खाली घालावी अशा पद्धतीने हे दोघेही त्यांच्या विधान सभा मतदार संघात लोकोपयोगी किंवा सार्वजनिक कामे उरकण्यात आघाडीवर होते. मेधा कुलकर्णी आणि नरेंद्र पवार न थांबता अजिबात निराश न होता आणि पक्ष नेत्यांवर उगाचच आगपाखड न करता त्यांनी केवळ आपल्या कार्यातून आपापली लोकमान्यता मिळविलेली आहे. कायम राखली आहे. चंद्रशेखर बावनकुळे की आशिष शेलार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठीच्या मोठा प्रश्न विशेषतः भाजपा श्रेष्ठींसमोर पडलेला होता. किंबहुना अमित शाह यांच्या मनात बावनकुळेंविषयी असलेला राग, ज्या प्रचंड रागातूनच बावनकुळे यांना गत विधानसभेपासून मुद्दाम दूर ढकलण्यात आलेले होते, पण पुढे याच बावनकुळे यांनी पायाला सतत भिंगरी लागल्यागत उभ्या राज्यात स्वतःला, सभा घेत प्रचार करीत झोकून दिले, मग याच शाह यांनी अगदी खुशीने बावनकुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष केले. कारण समस्त कोकणातल्या मराठा नेत्यांना त्यांचाच समाज कधीही राज्य नेतृत्व म्हणून कधीही डोक्यावर घेत नाही, घेणार नाही. मग ते नारायण राणे असतील, आशीष शेलार किंवा विनोद तावडे असतील किंवा भास्कर जाधव किंवा अन्य कोणीही असेल, त्यात आशीष शेलार यांच्यावर शरद पवार यांचे लाडके किंवा खबरी असा शिक्का बसलेला असल्याने, त्यांचे नाव मागे पडले आणि बावनकुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. वाचक मित्रांनो, बदल नक्की आहेत, भाजपामध्ये आतल्या आत भयंकर काहीतरी वेगळे शिजते आहे, बघूया…

हेमंत जोशी, मुंबई.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा