वर्धा : वर्धा येथील नालवाडी परिसरातील नागसेननगरात नरबळीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. एका महिलेने चिमुकल्याला पूजा करून विहिरीत ढकलून नरबळी देण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने मुलगा दोरीच्या साह्याने विहिरीतून बाहेर आल्याने त्याचा जीव वाचला. या प्रकरणी शहर पोलिसांनी नरबळी, इतर अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियमान्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पीडीत मुलगा केवल १२ वर्षांचा आहे. महिला फरार असून पोलिसांकडून तिचा शोध सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागसेन नगर येथे राहणाऱ्या शारदा राजू वरके हिने शेजारी खेळत असलेल्या बारा वर्षीय बालकाला बोलावून विहिरीजवळ नेले होते. या मुलाला तिने विहिरीला शेंदूर लावायला सांगितले. शेंदूर लावण्यासाठी वाकलेल्या बालकाला शारदाने धक्का मारुन विहिरीत ढकलले. त्यातर तिने तेथून पळ काढला. सुदैवाने मुलगा विहिरीत असलेल्या दोरीच्या सहाय्याने कसाबसा चढत विहीरीच्या बाहेर आला आणि त्याचे प्राण वाचले. घरी पोहचल्यानंतर या मुलाने आपल्या आई वडिलांना घडलेला सर्व प्रसंग सांगितला. आईच्या तक्रारीवरून आरोपी शारदा राजू वरके हिच्यावर खुनाच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय नरबळी अघोरी प्रथा व जादूटोणा कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर शारदा फरार असून पोलिसांकडून तिचा शोध सुरु आहे. तिने कोणाच्या सांगण्यावरुन हा प्रकार केला का, याचाही पोलिसांकडून शोध सुरु आहे.