म्हणाले, दुःखाचा डोंगर कोसळला तेव्हा दिशा दिली
मुंबई (Mumbai) : ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात (Padmashri Dr. Appasaheb Dharmadhikari was awarded the Maharashtra Bhushan Award today) आले आहे. लक्षावधी श्री सदस्यांच्या उपस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah ) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आप्पासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करीत आठवणींना उजाळा दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनीही आप्पासाहेबांचा कार्याचा गौरव केला आहे. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना आप्पासाहेबांनी मदत केली, दिशा दाखविली. ही आठवण सांगताना मुख्यमंत्री हळवे झालेले जाणवले. त्यांच्या आशिर्वादाने इथवर पोहोचलो आहे. पण, आज मुख्यमंत्री म्हणून नाही तर श्री सदस्य म्हणून उपस्थित असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्माधिकारी कुटुंबाच्या सामाजिक योगदानावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी, ज्ञानाच्या ज्योती घराघरात लावण्यात या कुटुंबाचे मोठे योगदान आहे. उद्ध्वस्त होणारी लाखो कुटुंब, भरकटणाऱ्या कुटुंबांना दिशा देण्याचे काम आप्पासाहेबांनी, नानासाहेबांनी केले. आता सचिनदादा त्यांचे कार्य पुढे नेत आहेत. या लाखो कुटुंबामध्ये माझेही एक कुटुंब होते. माझ्या कुटुंबावर जेव्हा दुःखाचा डोंगर कोसळला, तेव्हा मला ठाण्यात धर्मवीर आनंद दिघेसाहेबांनी आधार दिला. आप्पासाहेबांनी माझ्या संपूर्ण कुटुंबाला या समजाची सेवा करण्यासाठी मार्गदर्शन केले, दिशा दाखवली. म्हणूनच मी आज तुमच्यासमोर एक मुख्यमंत्री म्हणून नाही तर श्री सदस्य म्हणून उभा आहे. आप्पासाहेबांचे फार मोठे योगदान आहे. मी हे कदापी विसरू शकणार नाही. असे लाखो कुटुंब उद्ध्वस्त होत असताना आप्पासाहेबांनी दिशा देण्याचे काम केले म्हणून हा महासागर येथे उपस्थित आहे, अशी कृतज्ञ भावनाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील धर्माधिकारी कुटुंबाच्या योगदानाची माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच धर्मजागृतीचे कार्य करीत आहेत. लक्षावधी अनुयायांना त्यांनी मार्ग दाखविल्याची आणि त्यांच्या सामाजिक योगदानाची माहिती फडणवीस यांनी दिली.