“मुख्यमंत्र्यांच्या कामात माझा हस्तक्षेप नाही”: अजित पवार

0

मुंबई-मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुमच्या वापरावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याचे आरोप काँग्रेसकडून सुरु असताना अजित पवार यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. अर्थमंत्री म्हणून मी प्रकल्पांचा, विकासकामांचा आढावा घेऊ शकतो, असे अजित पवार यांनी (DCM Ajit Pawar on Cold War) स्पष्टच सांगितले. मी मुख्यमंत्र्यांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप केलेला नसल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले, अर्थमंत्री म्हणून मी विकास कामांचा, प्रकल्पांचा आढावा घेऊ शकतो. तुम्हाला काय त्रास आहे? असा सवालही त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना केला.

अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडीत असताना अनेकदा राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा पाठपुरावा करण्यासाठी 15 दिवसांनी आढावा बैठक घ्यायचो आणि त्याला गती द्यायचो. आताही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. स्वत: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर या कामांचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. त्याचा आढावा ते घेत असतात. राधेश्याम मोपलवार यांना त्या समितीची जबाबदारी दिली आहे. मी माझ्या पद्धतीने आढावा घेत आहे. वास्तविक आम्ही सरकारमध्येच विकासाच्या मुद्यावर गेलो आहेत, असेही ते म्हणाले.
अर्थमंत्री म्हणून मी प्रकल्पांचा आढावा घेऊ शकतो. मात्र एखाद्या प्रकल्पाबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचाच असतो. माध्यमांनी खरे तर खातरजमा न करता अशा चुकीच्या बातम्या दाखवू नये. माझ्या बैठकीमुळे राज्याचे प्रश्न, मेट्रोचे प्रश्न मार्गी लागत असेल तर काय अडचण आहे. थोडीशी यंत्रणा हलवली तर कामे होतात, असेही ते म्हणाले.