मला आयुष्यभर ती खंत राहणार-नारायण राणे

0

मुंबईः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Shiv Sena Pramukh Balasaheb Thackeray) यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. राणे यांनी ‘गुरुस्मरण’ शीर्षकासह एका सविस्तर पत्राच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण केली. बाळासाहेबांना त्यांच्या शेवटचा दिवसांत भेटता आले नाही, याची आयुष्यभर खंत राहणार असल्याचे राणे यांनी ट्विट केलेल्या या पत्रात नमूद केले आहे. बाळासाहेबांनी शेवटपर्यंत आपल्या माणसांना जपले व त्यांची काळजी घेतली. त्यांनी शेवटपर्यंत माणूसपण जपले होते, असेही राणे यांनी त्यात नमूद केले आहे. माझ्या स्वतःच्या यशात त्यांचा सिहांचा वाटा असून शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री असा प्रवाश केवळ त्यांच्यामुळेच करता आला, असेही त्यांनी नमूद केले आहे.
नारायण राणे यांनी आपल्या पत्रात नमूद केलेय की, “बाळासाहेबांच्या निधनाचं वृत्त मी टेलिव्हिजनवर पाहिलं. माझ्या हृदयात भावनांचा कल्लोळ उसळला होता. त्यांच्यासोबत घालवलेल्या कितीतरी क्षणांच्या आठवणीनं माझे डोळे ओलावले होते. माझ्या आत उचंबळून येणाऱ्या भावनांना मी कागदावर शब्दांतून मांडण्याचा प्रयत्न केला. सेना सत्तेवर आहे की नाही या गोष्टीचा त्यांच्यावर कधीच परिणाम झाला नाही. ते नेहमीच आपली बोलण्या-वागण्याची राजेशाही शैली तशीच राखून असत. त्यांच्यासारखे खरोखर तेच एकमेव होते. आपल्या काम करण्याच्या खास पद्धतीमुळे त्यांना राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा मिळालेली होती. असं व्यक्तिमत्त्व माझ्या गुरूस्थानी आहे, हे सांगताना मलाही अभिमान वाटत असे. साहेब, आपल्या शेवटच्या दिवसांत मला आपल्याला भेटता आलं नाही, याची मला आयुष्यभर खंत राहणार आहे. बाळासाहेब अतिशय दयाळू स्वभावाचे होते. ते पक्के राजकारणी कधीच नव्हते. आपलं माणूसपण त्यांनी शेवटपर्यंत जपलं” असा उल्लेख राणे यांनी केला आहे.
“आपल्या तीक्ष्ण बुद्धीनं आणि परोपकारी स्वभावामुळे त्यांना समाजाच्या घटकातून मित्र आणि अनुयायी लाभले. १९६६ मध्ये मराठी माणसाची एकमेव आशा म्हणून त्यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि नंतर त्यांनी कडव्या हिंदुत्त्वाचा पुरस्कार केला. त्यामुळेच मराठी माणूस आणि माझ्यासारखे तरूण त्यांच्याकडे चुंबकासारखे आकर्षित झाले होते. पक्ष चालवताना आपल्या पक्षाच्या माणसांवर ते प्रेमाचा जो वर्षाव करत आणि जो विश्‍वास दाखवत, त्यामुळे ती माणसं त्यांच्यासाठी जिवावर उदार व्हायलाही मागेपुढे पहात नसत. त्यांनी आपल्या माणसांची नेहमीच काळजी घेतली. दुःखाच्या प्रसंगी विचारपूस करायला ते कधीही विसरले नाहीत. अशा वागणुकीमुळेच ते आपल्या पक्षाचेच नाही, तर अवघ्या महाराष्ट्राचे लाडके नेते होते. मला स्वतःला साहेबांचं खूप प्रेम मिळालं. त्यांनी माझ्यावर खूप विश्‍वास ठेवला होता. मी आज जो आहे, तो त्यांच्यामुळे आहे, हे कबूल करण्यात मला कसलाही कमीपणा वाटत नाही. माझ्या राजकीय यशात साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री ते विरोधी पक्षनेता असा माझा जो अविश्वसनीय प्रवास झाला आहे, तो केवळ साहेबांच्यामुळेच शक्‍य झाला आहे.” असेही राणे नमूद करतात.