पंतप्रधान मोदी यांचे ‘एक्झाम वॉरियर्स’ पुस्तक आता १३ भारतीय भाषांमध्ये

0

नवी दिल्ली  (NEW DELHI) :   विद्यार्थ्यांना परीक्षांवरील मार्गदर्शन करणे, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अत्यंत आवडता विषय आहे. त्यामुळे ‘परीक्षा पे चर्चा’ हा उपक्रमासोबतच पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थी, शिक्षक व पालकांना मार्गदर्शन करणारे ‘एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तकाची (PM Narendra Modi`s Book Exam Warriors ) निर्मिती केली. परीक्षेचा सामना विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीचे करायचा, याचे मार्गदर्शन करणारे २५ मंत्र मोदी यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून सांगितले आहेत. २०१८ मध्ये प्रकाशित झालेले हे पुस्तक आता इंग्रजी, हिंदी, मराठीसह एकूण १३ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध झाले आहे. सध्याचे शैक्षणिक वातावरण लक्षात घेता कुठल्याही परीक्षेची तयारी ही विद्यार्थ्यांसाठी एक युद्धच असते. परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात परिश्रमही करतात. मात्र, त्याचवेळी ते कायम प्रचंड तणावात असतात. परीक्षेची चिंता सोडून एखाद्या योद्ध्याप्रमाणे परीक्षांचा सामना करण्याची प्रेरणा या पुस्तकातून विद्यार्थ्यांना मिळते. यासाठी पुस्तकात २५ मंत्र नमूद केलेले आहेत. हे मंत्र सविस्तर प्रकरणांच्या स्वरुपात आहेत. परीक्षेचा ताण आणि चिंता यापासून मुक्ती मिळवून देणे हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. पुस्तकाची नवी आवृत्ती अलिकडेच लाँच करण्यात आली.

परीक्षा म्हटल्या की विद्यार्थी कायम तणावात असतात. या तणावामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर नकारात्मक परिणाम होतात व त्याचा टोकाचा परिणाम म्हणून अप्रिय घटना देखील घडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तणावाचा सामना कसा करावा याच्या टिप्स पुस्तकात देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी तणावाचे व्यवस्थापन कसे करायचे, याचे अनेक मार्गही पंतप्रधान मोदी यांनी पुस्तकात सुचविले आहेत. पुस्तक पंतप्रधान मोदी यांनी पालक आणि शिक्षकांना उद्देशून लिहिलेल्या पत्राचा देखील समावेश असून त्यात बोर्डाच्या म्हणजेच दहावी, बारावीच्या परीक्षेत काय लक्षात ठेवले पाहिजे, यावर मार्गदर्शन आहे.

पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थी, शिक्षक व पालकांना मार्गदर्शन करताना माजी राष्ट्रपती व मिसाईल मॅन म्हणून प्रख्यात डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे उदाहरण पुस्तकात नमूद केले आहे. “ परीक्षा म्हणजे काही संपूर्ण जीवनाची परीक्षा नाही”, असे असे डॉ. कलाम सांगायचे. “डॉ. कलाम यांना खरं तर फायटर पायलट व्हायचं होतं. पण, त्यांना ते शक्य झाले नाही. तथापि, ते अजिबात निराश झाले नाहीत. त्यांनी वेगळी वाट धरली व ते महान शास्त्रज्ञ बनले. आजही डॉ. कलाम यांची महान शास्त्रज्ञ म्हणून ओळख आहे”, याकडे पंतप्रधान मोदी आपल्या पुस्तकात लक्ष वेधतात.
“परीक्षा ही जणुकाही आपल्या आयुष्यातील स्वप्नाचा शेवट आहे, तो जीवन मरणाचा प्रश्न आहे, असे अनेकांना वाटते. नेमकी येथेच खरी समस्या सुरु होते,” असे पंतप्रधान मोदी आपल्या पुस्तकात नमूद करतात. “प्रत्यक्षात परीक्षा ही आयुष्य घडवण्याची एक संधी आहे. ही संधी आपण त्या स्वरुपात स्वीकारली पाहिजे. प्रत्यक्षात आपण स्वतःला कसोटीवर पारखून पाहण्याच्या संधी शोधत राहिले पाहिजे. जेणेकरून आपण आणखी चांगली कामगिरी करू शकू. त्यामुळे आपण पळ काढता कामा नये”, असे पंतप्रधान मोदी नमूद करतात.

सणांप्रमाणे साजरी व्हावी परीक्षा

“विद्यार्थ्यांनी परीक्षांबाबत अनावश्यक चिंता बाळगण्याचे कारणच नाही. परीक्षा या एकप्रकारे सणांसारख्या असतात. परीक्षेतून आपली नव्हे तर आपल्या शैक्षणिक तयारीची तपासणी होत असते. त्यामुळे विद्यार्थींनी एखाद्या सणांप्रमाणे परीक्षा साजरी करायला हवी. परीक्षेच्या काळात विद्यार्थींनी खेळ खेळले पाहिजे. तणाव निर्मूलनासाठी योगासनं केली पाहिजे. त्याचप्रमाणे पुरेशी झोपही घेतली पाहिजे. परीक्षेची चिंता सोडून सामना करायला शिकलं पाहिजे. स्पर्धा ही स्वतःसोबत केली पाहिजे. अभ्यासाचे तंत्र आत्मसात करा. परीक्षेत कॉपी करण्याचा मार्ग सोडून विद्यार्थ्यांनी स्वतःला ओळखून वाटचाल केली पाहिजे”, असा सल्लाही ते पुस्तकातून देतात.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा