ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा

0

मुंबईः बंडखोरीचा मोठा फटका बसलेला शिवसेनेच्या ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने अखेर सोमवारी मुंबईत युतीची घोषणा (Shiv Sena (UBT) and Vanchit Bahujan Aghadi Alliance Announced) केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे निमित्त साधून उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत युतीची घोषणा झाली. “देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र येत आहोत. पुढील राजकीय वाटचाल कशी असेल याच्याबद्दल आम्ही नंतर वेळेनुसार निर्णय घेऊ”, असे यावेळी उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. तर “शरद पवार हे देखील आमच्यासोबत येतील, अशी आशा आहे” अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.

ही घोषणा झाली त्यावेळी सुभाष देसाई, संजय राऊत, अरविंद सावंत तर वंचित बहुजन आघाडीकडून रेखाताई ठाकूर या नेत्यांची उपस्थिती होती. युतीची घोषणा करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर आणि आम्ही पुढची वाटचाल एकत्र घेऊन जाण्यासाठी एकत्र आलो आहोत. माझे आजोबा आणि प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा हे स्नेही होते. दोन्ही पिढ्यांचे वारसदार आणि जीवाला जीव देणारे सहकारी एकत्र येऊन ‘देश प्रथम’ याचा विचार करुन पुढे जाणार आहोत. देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र येत आहोत. पुढील राजकीय वाटचाल कशी असेल याच्याबद्दल आम्ही नंतर वेळेनुसार निर्णय घेऊच, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील सोबत येणार काय, या प्रश्नावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आमची भांडणे जुनी असली तरी शेतातली नाही. त्यामुळे ते आमच्यासोबत येतील, अशी आशा आम्ही बाळगून आहोत.