मुंबई : शेतकऱ्यांना बोगस बियाणे विकून फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांवर आता कठोर कायद्याचा बडगा उगारला जाणार आहे. बोगस बियाणे विकण्याचे प्रकार रोखण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारने कंबर कसली असून लवकरच यासाठी कठोर कायदा आणला जाणार आहे बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांना किमान दहा वर्षांची शिक्षा ठोठावता येईल असा कायदा आणला जाणार असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे.
पेरणीच्या हंगामात अनेकदा शेतकऱ्यांना बोगस बियाणे देऊन त्यांची फसवणूक करण्यात येत असल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बियाणेच्या बाबतीत होणारी फसवणूक थांबवण्यासाठी आता शिंदे-फडणवीस सरकराने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या अधिवेशनात हा कायदा आणला जाणार असल्याची घोषणा कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी केली आहे. अकोला येथील कार्यक्रमात बोलताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी ही घोषणा केली. ज्यांच्याकडे बोगस बियाणे, बोगस औषधे किंवा खते असतील, त्यांनी ती तत्काळ नष्ट करावी, असा इशारा कृषीमंत्र्यांनी दिला.