नागपूरः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती (DCM Devendra Fadnavis Affidavit Case) आपल्या चुकीने राहुन गेली होती. फडणवीस यांनी आपल्यावर विश्वास ठेवून त्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी केली, अशी कबुली फडणवीस यांचे वकील अॅड. उदय डबले यांनी न्यायालयात दिल्याचे वृत्त नागपुरातील एका वर्तमानपत्राने दिले (DCM Devendra Fadnavis) आहे. अॅड. डबले यांनी न्यायालयात सांगितले की, फडणवीस यांचा वकील म्हणून विधानसभा निवडणुकीचा फॉर्म भरण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. फॉर्म भरत असताना 2 गुन्ह्यांचा उल्लेख आपल्या चुकीने, लक्षात न आल्याने करण्यात आला नव्हता, असेही डबले यांनी सांगितले.
2014 सालच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात फडणवीस यांनी दोन गुन्ह्यांची माहिती न दिल्याचा आरोप करीत वकील सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने देवेंद्र फडणवीस यांच्याविरूद्ध खटला चालवण्याचे आदेश दिले होते.
फडणवीस यांनी उमेदवारीची कागदपत्रे भरताना फॉर्म 26 मध्ये 22 गुन्हाच्या उल्लेख केला होता. मात्र, 2 गुन्ह्यांचा उल्लेख त्यात नव्हता. फडणवीस यांनी लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करीत त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी ॲड. सतीश उके यांनी केली होती. सदर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेत फडणवीस यांच्याविरूद्ध खटला चालवण्याची मंजुरी दिली होती. सध्या हा खटला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुरू आहे. 6 मे रोजीच्या सुनावणीत साक्षीदार या नात्याने अॅड. उदय डबले यांनी सरतपासणी घेण्यात आली. त्यावेळी डबले यांनी ही कबुली दिली. यात माझा किंवा फडणवीस यांचा गुन्हे लपविण्याचा कुठलाही हेतू नव्हता, असेही त्यांनी सांगितले.