जी -२० निमित्त छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ,२४ पर्यंत जनतेसाठी खुले

0

 

नागपूर – माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनात नागपूर व विदर्भातील वनसंपदा, प्राणी, पक्षी, वास्तू आणि संस्कृतीचे कलात्मक प्रतिबिंब उमटले आहे, अशा भावना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केल्या.
नागपूर मध्ये २० व २१ मार्च रोजी होणाऱ्या जी-२० बैठकीच्या निमित्ताने जिल्हा माहिती कार्यालय मार्फत आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
शहरात आयोजित होणाऱ्या सी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील निवडक छायाचित्रांचे येथील मध्यवर्ती संग्रहालयात प्रदर्शन लावण्यात आले.देशपांडे यांच्या हस्ते आणि विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, मध्यवर्ती संग्रहालयाच्या अभिरक्षक जया वाहणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या प्रदर्शनात नागपूर व विदर्भातील वनसंपदा, प्राणी, पक्षी, वारसास्थळे, सण-उत्सवासह या भागातील विविध सांस्कृतिक पैलू आकर्षकरित्या मांडण्यात आले आहेत. छायाचित्रकारांनी जणू नागपूर व विदर्भातील वैविद्यपूर्ण ठेवा आपल्या कॅमेऱ्याद्वारे कलात्मकरित्या टिपले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून कल्पकतेला उत्तम मंचही उपलब्ध झाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
एकूण चार विषयांवर आयोजित या छायाचित्र स्पर्धेसाठी मोठया प्रमाणात प्रवेशिका प्राप्त झाल्या. यातील विजेत्या सहा छायाचित्रकांरांना मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांच्यासह उपस्थित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीप्रत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
३ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ दरम्यान ही छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली. ‘विदर्भातील वाघांचे अस्तित्व व जंगल’ (नागपूर : टायगर कॅपीटल ऑफ इंडिया) या विषयावर प्राप्त छायाचित्रकारांपैकी नारायण मालू यांना प्रथम क्रमाकांच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रथिश के. यांना व्दितीय तर आरती फुले यांना तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘नागपूर हेरिटेज’ विषयावरील छायाचित्र स्पर्धेत रोहित लाडसगावकर यांना, ‘नागपुरातील सण, उत्सव, खाणपान व परंपरा’ विषयावरील स्पर्धेत निधीका बागडे तर ‘नागपूर जिल्ह्यातील धार्मिक स्थळे’ या विषयावरील स्पर्धेत अविनाश चौधरी यांना अनुक्रमे पहिल्या क्रमाकांच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. या
यावेळी परिक्षक समितीचे सदस्य छायाचित्रकार सर्वश्री नानु नेवरे, सुदर्शन साखरकर आणि राकेश वाटेकर यांचाही सत्कार करण्यात आला.सुत्रसंचालन रेणुका देशकर यांनी तर माहिती अधिकारी अतुल पांडे यांनी आभार प्रदर्शन केले.
येत्या २४ मार्च पर्यंत कार्यालयीन वेळेत (सार्वजनिक सुटिंच्या दिवसांसह) सर्वांसाठी हे प्रदर्शन निःशुल्क खुले राहणार आहे. विद्यार्थी,छायाचित्रकार, कलाप्रेमींनी या प्रदर्शनास मोठ्या संख्येने भेट द्यावी ,असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी टाके यांनी केले आहे.

 

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा