Incident in Chandrapur, Bhandara district वेगवेगळ्या घटनांत 3 बिबट्यांचा मृत्यू चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यात घटना

0

नागपूर. चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur district ) रविवारी दोन तर भंडारा जिल्ह्यात (Bhandara district ) एका अशा एकूण तीन बिबट्यांचा मृत्यू (Three leopards died ) झाला. सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील कन्हाळगाव येथे दोन बिबट्यांमधील वर्चस्वाच्या लढाईत एका तीन वर्षीय नर बिबट्याचा मृत्यू झाला, तर चंद्रपूर – बल्लारपूर मार्गावर भिवकुंड नाक्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला. याचप्रमाणे शिकारीच्या शोधात जंगल परिसरातून राष्ट्रीय महामार्ग ओलांडणाऱ्या बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना लाखनी वनपरिक्षेत्रातील जांभळी मध्यवर्ती रोपवाटिका नजीक रायपूर ते साकोली रस्त्यावर घडली. भंडाऱ्यातील घटनेत ठार झालेल्या बिबट्याचा यापूर्वीही अपघात झाला होता. त्याने वनरक्षकावर हल्लासुद्धा केला होता. अलिकडे वन्यप्राण्यांच्या आपसातील झुंजी तसेच मानव –वन्यप्राणी संघर्ष तीव्र झाला आहे. सुरक्षित वनांमुळे एकीकडे प्राण्यांची संख्या वाढत आहे. परिणामी जंगलात उपलब्ध अन्न कमी पडू लागल्याने प्राणी मानवी वसाहतींकडे धाव घेत असल्याने या घटना घडत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पालगतच्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वाघ आणि बिबट विरुद्ध मानव संघर्ष सुरू असतानाच जंगलातील वास्तव्यासाठी दोन बिबट्यांमधील अस्तित्वाच्या लढाईमध्ये एका बिबट्याने दुसऱ्या तीन वर्षीय नर बिबटला ठार केले. दुसऱ्या घटनेत, भिवकुंड नाक्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला. बिबट्याला धडक दिल्यानंतर वाहनचालक पसार झाला आहे. वन खाते वाहनाचा शोध घेत आहे. ही घटना रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. त्यावेळी या रस्त्यावर सर्वत्र अंधार होता. वन अधिकाऱ्यांना माहिती मिळताच संपूर्ण पथक घटनास्थळी पोहचले. बिबट्याचा मृतदेह रस्त्यावर पडून असल्यामुळे वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती. दरम्यान, बिबट्याला धडक देणारे वाहन चारचाकी असावे, असा अंदाज आहे.
जुलैमधील पहिल्या अपघातात वाचला
लाखनी वनपरिक्षेत्रात ठार झालेल्या बिबट्याच्या शरीरावरील जखमा व अंतर्गत रक्तस्त्राव यावरून वाहनाच्या जबर धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मृत बिबटाचे वय अंदाजे 7 ते 8 वर्ष असून 27 जुलै 2022 रोजी मोहघाटा परिसरात वाहनाच्या धडकेत किरकोळ जखमी झालेल्या याच बिबटाने वनरक्षक सानप यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले होते.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा