विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन

0

परीक्षांवर परिणामाची शक्यता : विद्यार्थी चिंतेत

अमरावती. राज्य मंडळाच्या 12 वीच्या परीक्षा (State Board 12th Exams ) मंगळवारपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालयीन आणि विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आज २० फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारला (College and university non-teaching staff in the state have called an indefinite strike ) आहे. कर्मचारीच नसल्याने अनेक कॉलेज बंद असल्याचे दिसून आले. आश्वासित प्रगती योजना, 58 महिन्याची थकबाकी, 1410 कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. अमरावीसह राज्यात अनेक ठिकाणी विद्यापीठ, महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आज धरणे आंदोलन करीत लक्ष वेधून घेतले आहे. या आंदोलनामुळे विद्यापीठाच्या परीक्षांच्या कामकाजावर परिणाम होण्याचे संकेत मिळत असून विद्यार्थीव पालकवर्गात चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. कर्मचारी संघटनांनी इशारा देऊनही सरकारने कोणतीच उपाययोजना केली नाही. यामुळे नाईलाजाने संपावर जाण्याची वेळ आल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने २ फेब्रुवारीपासून परीक्षा कामकाजावर बहिष्कार आंदोलन सुरू केले आहे. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून टप्प्या टप्प्याने आंदोलन तीव्र करण्यात आले. प्रथम १४ फेब्रुवारीला निदर्शने केली. तत्पश्चात १५ फेब्रुवारीला काळ्या फीत लावून कामकाज करण्या आले, तर १६ फेब्रुवारीला लाक्षणिक संप करण्यात आला. मात्र, राज्य सरकारने कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागण्यांची कोणतीही दखल घेतली नाही. अखेर विद्यापीठ आणि महाविद्यालय स्तरावर बेमुदत काम बंद आंदोलन केले जाईल, असा पवित्रा संघटनांनी घेतला आहे.
सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना पुनरुज्जीवित करणे, सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची थकबाकी कर्मचाऱ्यांना मिळणे, लाभाची योजना लागू करणे, विद्यापीठ-महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणे, २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहीत धरून त्याआधारे सातव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करणे अशा मागण्यांवर संघटना ठाम आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. मात्र जोपर्यंत मागण्या लेखी मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने घेतला आहे. त्यामुळे आज अनेक महाविद्यालयांमध्ये शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारला आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा