
मुंबईः विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या सर्व ५६ आमदारांसाठी व्हीप जारी केला आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहा-पानाच्या कार्यक्रमास शिवसेनेच्या ५६ आमदारांनी उपस्थित राहण्याच्या सूचना प्रतोदांकडून करण्यात आल्या असल्याचे सांगितले. यामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांचाही समावेश (Shiv Sena issues Whip for All MLA`s) आहे. यामुळे आता ठाकरे गटापुढे पेच निर्माण झाला असून व्हीपवर काय भूमिका घ्यायची हे त्यांना ठरवावे लागणार. व्हिपचे उल्लंघन केल्यास अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सर्व आमदारांना व्हीपचे पालन करावे लागेल, असे मत आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण दिला आहे. यानंतर शिंदे गटाकडून विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा घेण्यात आला.
सोमवारी शिवसेनेच्या विधान भवनातील विधीमंडळ पक्ष कार्यालयाचा ताबा घेतल्यानंतर संजय शिरसाट यांना पक्ष फंड आणि शिवसेना भवन ताब्यात घेणार का, असा सवाल विचारण्यात आला असता पक्ष फंड किंवा शिवसेना भवन बळकवण्याचे आमचे प्रयत्न कुठेही नव्हते. आम्हाला या पक्षाचे चिन्ह आणि नाव हे महत्वाचे होते. या प्रकरणात निवडणूक आयोगाकडे झालेल्या सुनावणीत झालेल्या निर्णायाच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही पक्ष कार्यालयात जाऊन बैठक घेतली. शिवसेना भवन हे आमच्यासाठी प्रॉपर्टी नाही तर मंदिर आहे. त्यामुळे शिवसेना भवनावर आम्ही अधिकार सांगणार नाही. ते ताब्यात घेण्याचा कुठलाही विचार नाही, असे शिरसाट म्हणाले.