मान्सुनपुर्व देखभाल व दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर पुर्ण करण्याच्या सुचना – परेश भागवत

0

नागपूर, 24 मे 2025: येणारा पावसाळा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा यासाठी मान्सुनपुर्व देखभाल व दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर पुर्ण करण्याच्या सुचना महावितरणच्या नागपुर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी दिल्या. पुढील तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने, या कालावधीसाठी आणि संपूर्ण पावसाळ्यासाठी आपत्कालीन नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बुधवारी (21 मे) नागपूर शहर आणि परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे वीज वितरण यंत्रणा विस्कळीत झाली होती. यामुळे नागरिकांना झालेल्या त्रासाची गंभीर दखल घेत, प्रादेशिक संचालक भागवत यांनी नागपूर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अभियंते आणि इतर अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. या बैठकीत वर्धा मंडलातील अभियंते व्हीडीओ कॉन्फ़रसिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

या बैठकीत भागवत यांनी परिमंडल आणि मंडल स्तरावर 24×7 आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्ष तात्काळ स्थापन करण्याचे निर्देश दिले. वीजपुरवठा खंडित झाल्यास तो तातडीने सुरू करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, तसेच कोणीही मुख्यालय सोडू नये असे त्यांनी बजावले. एखाद्या ठिकाणी दुरुस्ती कामाला विलंब लागणार असल्यास, त्याची माहिती संबंधित ग्राहकांना ‘एसएमएस’, व्हॉट्सअॅप ग्रुप्स, ट्विटर, सोशल मीडिया आणि प्रसिद्धी माध्यमांद्वारे तात्काळ कळवण्याचे निर्देश देण्यात आले.

“शक्य असूनही वीजपुरवठा वेळेत सुरू न झाल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल आणि कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही,” असे भागवत यांनी स्पष्ट केले. मोठ्या आणि गंभीर बिघाडाच्या ठिकाणी वरिष्ठ अभियंत्यांनी स्वतः उपस्थित राहून दुरुस्ती कामांना गती द्यावी असेही त्यांनी सांगितले. तसेच, देखभाल व दुरुस्तीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याचे नियोजन असल्यास, त्याचीही पूर्वसूचना ग्राहकांना तात्काळ देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

वादळ-वाऱ्यामुळे वीजयंत्रणेचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता, प्रत्येक परिमंडल स्तरावर विजेचे खांब, रोहित्र, वीजतारा, ऑईलसह इतर यंत्रसामग्री पुरे प्रमाणात उपलब्ध ठेवण्याचे निर्देश भागवत यांनी दिले. पावसामुळे नादुरुस्त झालेल्या वीज यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी संबंधित अभियंते, कर्मचारी आणि सर्व एजन्सींनी मनुष्यबळ, सामग्री व वाहनांसह युद्धपातळीवर तयार राहण्याची सूचना त्यांनी केली. कामादरम्यान सुरक्षिततेची सर्वतोपरी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या बैठकीत नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके आणि नागपूर शहर मंडलचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांनी बुधवारी खंडित झालेला वीजपुरवठा युद्धपातळीवर सुरळीत केल्याची माहिती दिली. मुसळधार पाऊस सुरु असतांनाही महावितरणने सर्व बंद पडलेल्या वीज वाहिन्या 18 मिनिटे ते 2.30 तासात सुरु केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी आज नागपूर शहरातील मानकापूर, झिंगाबाई टाकळी, महाल, तुळशीबाग आणि जुनी शुक्रवारी या भागांना भेट देत वीज वितरण यंत्रणेची पाहणी केली. नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे बंद पडलेल्या वीज वाहिन्यांची त्यांनी पाहणी केली आणि आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी वीजपुरवठ्याची सद्यस्थिती आणि वीज संबंधी तक्रारींचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान भागवत यांनी विविध उपकेंद्रांची पाहणी केली. नव्याने उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती जाणून घेतली. नवीन प्रस्तावित पायाभूत सुविधांच्या ठिकाणी परिसर स्वच्छ आणि नीटनेटका ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

भागवत यांनी विभाग कार्यालये, कार्यालयीन सहाय्यक आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कार्यपद्धतीचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. ग्राहकांशी संवाद कसा साधावा याचे प्रात्यक्षिकही त्यांनी घेतले. याशिवाय, त्यांनी तक्रारींच्या नोंदी, नवीन वीज जोडण्या आणि सौर जोडण्यांशी संबंधित कार्यालयांतील नोंदवह्यांची तपासणी केली.

फ़ोटो ओळ – मानकापूर येथील उपकेंद्राची पाहणी करतांना महावितरणचे प्रादेशिक संचालक परेश भागवत, सोबत इतर अधिकारी

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर