
बल्लारपूर पॉलीटेकनिक विजेता तर श्री साई पॉलीटेकनिक चंद्रपूर उपविजेते
चंद्रपूर येथे रविवार, दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आलेली पॉलिटेक्निक स्टाफ क्रिकेट टूर्नामेंट मोठ्या उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडली. या क्रीडा स्पर्धेचे आयोजन पॉलिटेक्निक स्टाफ क्रिकेट टूर्नामेंटचे अध्यक्ष के. एम. ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली तसेच पॉलिटेक्निक स्टाफच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या स्पर्धेत सोमय्या पॉलिटेक्निक, गुरुसाई पॉलिटेक्निक, बजाज पॉलिटेक्निक, श्री साई पॉलिटेक्निक, बीआयटी पॉलिटेक्निक बल्लारपूर आणि रिनेसन्स पॉलिटेक्निक अशा एकूण सहा पॉलिटेक्निक महाविद्यालयांच्या स्टाफ संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेदरम्यान सर्व संघांनी शिस्तबद्ध खेळ, उत्कृष्ट खेळाडूवृत्ती आणि संघभावनेचे प्रभावी दर्शन घडवले. अंतिम सामन्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत बीआयटी पॉलिटेक्निक, बल्लारपूर संघाने विजेतेपद पटकावले, तर श्री साई पॉलिटेक्निक संघ उपविजेता ठरला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विदयापीठ सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखेडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक चषक देण्यात आले. सोबतच यावेळी प्रा. संघपाल सरकटे यांची सुद्धा अतिथी म्हणून उपस्थिती होती. या स्पर्धेमुळे विविध पॉलिटेक्निक महाविद्यालयांतील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांमध्ये आपुलकी, सहकार्य आणि मैत्रीभाव अधिक दृढ झाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक अध्यक्ष के. एम. ठाकरे यांनी सर्व सहभागी संघ, आयोजक, पंच, स्वयंसेवक तसेच उपस्थित प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले.




















