
शेतकरी राजा आता होणार चिंतामुक्त!
नागपूर, 22 डिसेंबर 2025: शेतात दिवसा सिंचन करण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेने महाराष्ट्राच्या शेतीमध्ये क्रांती घडवून आणली आहे. आता या योजनेचा लाभ घेताना किंवा देखभाल करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी महावितरणने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांना आता कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नसून, घरबसल्या एका क्लिकवर आपल्या तक्रारींचे निवारण करता येणार आहे.
तक्रार निवारण पोर्टल: पारदर्शक आणि वेगवान:
सौर कृषी पंप बसवताना विलंब होत असेल किंवा सुरू असलेल्या पंपात तांत्रिक बिघाड झाला असेल, तर आता थेट ऑनलाइन दाद मागता येईल. महावितरणने यासाठी विशेष ‘तक्रार निवारण पोर्टल’ सज्ज केला असून, तक्रारीचा मागोवा (Status Tracking) घेण्याची सोयही उपलब्ध करून दिली आहे.
तक्रार नोंदवण्याची सोपी प्रक्रिया (स्टेप-बाय-स्टेप):
शेतकरी बांधवांनो, आपली तक्रार नोंदवण्यासाठी सौर कृषी पंप धारकाने सर्वप्रथम महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर जा. त्यावरील होमपेजवर डाव्या बाजूला असलेल्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ या टॅबवर क्लिक करा. तेथील तक्रार निवारण टॅबवर जाऊन तिथे ‘Register Complaint’ (तक्रार नोंदवा) हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर तक्रार निवारण’ विभागात जाऊन. तक्रार नोंदवताना आपला लाभार्थी क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक किंवा जिल्हा, तालुका, गाव आणि लाबार्थीचे नाव टाकून शोधा व त्यानंतर आपली समस्या सविस्तर लिहा किंवा तक्रारीच्या स्थितीचा आढावा, देखील तुम्ही याच पोर्टलवर पाहू शकता
नागपूर परिमंडलाची यशस्वी वाटचाल
नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील हजारो शेतकरी आज सौर ऊर्जेवर यशस्वीपणे शेती फुलवत आहेत. मागेल त्याला सौर पंप योजना, मुख्यमंत्री सौर पंप योजना आणि अटल सौर पंप योजनांतर्गत नागपूर परिमंडळालात तब्बल 7 हजार 94 सौर पंप कार्यान्वित झाले आहेत. यात नागपूर जिल्ह्यातील 4 हजार 880 तर वर्धा जिल्ह्यातील 2 हजार 214 पंपाचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातून आलेल्या सर्व तांत्रिक तक्रारींचे महावितरणने यशस्वीपणे निवारण केले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा या योजनेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
तुम्ही अजूनही सौर पंप घेतला नाही का?
‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ ही योजना केवळ वीज बिल वाचवत नाही, तर रात्रीच्या वेळी साप-विंचवाच्या भयातून मुक्तता देऊन दिवसा सुरक्षित सिंचनाची हमी देते. याशिवाय मोफत/सवलतीच्या दरात सौर संच. दिवसा हक्काची वीज. कमी देखभाल खर्च आणि 10 ते 25 वर्षांची गॅरंटी. पर्यावरणपूरक शेती. यामुळे, ही योजना शेतक-यांसाठी वरदान ठरत असून राज्यातील दुस-या हरित क्रांतीकडे मार्गक्रमण करीत आहे.
शेतकरी बांधवांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता, तांत्रिक अडचणींसाठी या ऑनलाइन सुविधेचा लाभ घ्यावा आणि ज्यांनी अजून अर्ज केला नाही, त्यांनी त्वरित ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेचा लाभ घेऊन आपली शेती समृद्ध करावी, असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.



















