वाढीव वीज दराविरोधात जय विदर्भ पार्टीचे जागतिक ग्राहक दिनी निदर्शने – व्हेरायटी चौक येथे रस्ता रोको

0

 

नागपूर -जय विदर्भ पार्टीच्या वतीने बुधवारी प्रस्तावित 37 % टक्के वीज दरवाढ विरोधात व्हेरायटी चौक, गांधी पुतळा येथे नारे निदर्शने झाली. यावेळी संतप्त विदर्भवाद्यांनी काही काळ व्हेरायटी चौक येथे रस्ता रोखून धरला. विदर्भात वीज निर्मिती होत असूनही विदर्भाच्या जनतेची भार अधिभार, वहन कर, इंधन समायोजन आकार, स्थिर आकार, इन्फ्रा आकार व त्यावर व्याज इत्यादी कराच्या माध्यमातून लुटमार केली जात आहे. वीज निर्मितीसाठी जमीन विदर्भाची गेली. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी वापरले जात आहे कोळसा सुद्धा विदर्भाच्या पोटातून काढल्या जात असताना प्रदूषणाचा भार सुद्धा विदर्भाच्या जनतेला सोसावा लागत आहे. यातून दुर्धर आजारांना सामोरे जावे लागत असून मृत्यूसुद्धा ओढवत आहेत. विदर्भात वीज सरासरी २ रुपये ५० पैसे इतक्या दराने निर्माण होते, महावितरणला ६७ हजार ६४४ कोटीचा तोटा होत असल्याचे सांगून ही दरवाढ प्रस्तावित केली आहे. महावितरण तोट्यात का ? किती दिवस महाराष्ट्र सरकार वैदर्भीय जनतेला लुटणार असा सवाल जय विदर्भ पार्टीद्वारे यानिमित्ताने उपस्थित करण्यात आला.