नागपूर – राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा नागपूर आणि विविध कामगार संघटनांनी जुनी पेन्शन योजना लागू करा यासह विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या काम बंद आंदोलन आंदोलनाला दुसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संविधान चौकात दुपारी हजारो कर्मचाऱ्यांच्या घोषणाबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा, अंशकालीन कंत्राटी रोजंदार कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करा, सर्व रिक्तपदे तत्काळ भरा, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती विनाशर्त करा, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मंजूर पदे निरसित करू नका, नवीन शिक्षण धोरण रद्द करा, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे सध्या रोखलेले पदोन्नती सत्र तात्काळ सुरू करा, आदिवासी नक्षलग्रस्त भागात प्रोत्साहन भत्ता, शिक्षक सेवक ग्रामसेवक मानधनात वाढ, शासकीय विभागाचे खाजगीकरण, कंत्राटीकरण,महामंडळ करण्यास मज्जाव आदी मागण्यासाठी हा बेमुदत संप कामगार संघटनांनी पुकारला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे, सरचिटणीस विश्वास काटकर, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले,सरचिटणीस संजय माळकर, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा अध्यक्ष गोपीचंद कातुरे, कार्याध्यक्ष संजय तांबडे, कोषाध्यक्ष अरविंद मदने,सरचिटणीस उत्तम झेलगोंदे, महाराष्ट्र राज्य गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सरचिटणीस प्रकाश बने यांच्यासह सर्वश्री ज्ञानेश्वर महाले,नारायण समर्थ, बुधाजी सुरकर, शाम वांदिले, नाना कडवे,यशवंत कडू, सुनील व्यवहारे, प्रल्हाद शिंदे, नितीन सोमकुवर, मंगला जाळेकर, स्नेहल खवले, मनीष किरपाल, राजेंद्र ठाकरे, प्रशांत राऊत, राजेश मते, राजेंद्र ढोमणे,ऋषिकेश सरदेशपांडे,पद्मा सलामे, दिपेंद्र शाहू, किरण सुपे, के एन ठाकूर, प्रदीप अंधारे ,सुहासिनी ठाकरे, सुधाकर प्रचंड,निथिलेश सोनकांबळे, विनोद पारजवार, संजय तांदूळकर, गौतम घोंगडी, वंदना परिहार, सुशील शिंदे, नामदेव पटले, वासुदेव राठोड आदी अनेक पदाधिकारी व मोठ्या संख्येने कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले. जुनी पेन्शन संदर्भात राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा यासाठी सुरू झालेल्या आंदोलनात आता कुठल्याही परिस्थितीत माघार नाही असा इशारा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष गोपीचंद कातुरे यांनी दिला.