चंद्रपूर : शरद यादव यांच्या स्वर्गवासाने स्व.जयप्रकाश नारायण यांच्या प्रखर अनुयायाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार (Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar)यांनी स्व.शरद यादव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
भारतरत्न अटलजींच्या मंत्रीमंडळात शरद यादव हे एक प्रमुख मंत्री होते. चुका झाल्यास स्वतः च्या सहकाऱ्यांनाही जाहिरपणे चार शब्द सुनावण्याचे धैर्य त्यांच्यात होते, असे सांगून ना. श्री मुनगंटीवार पुढे म्हणाले की शरद यादव यांनी नेहमी गरींबाकरता राजकारण केले. समाजवादावर त्यांची श्रद्धा असली तरी ती आंधळी श्रद्धा नव्हती आणि गरीबकल्याणाकरता त्याकाळी समाजवाद्यांनी दूर ठेवलेल्या भाजपासोबत युती करायला त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. राजकारणात आंधळा विरोध कामाचा नाही, तर जनतेचे कल्याण आणि देशाची उन्नती ही मूल्ये जपली पाहिजेत हे त्यांनी दाखवून दिले. दुर्दैवाने नंतर स्वतः च्याच पक्षात एकटे पडण्याची वेळ त्यांच्यावर आली, तरी त्यांनी जयप्रकाशजींच्या विचाराची कास सोडली नाही.
त्यांच्या निधनाने जयप्रकाशजींच्या पावलांवर चालणारा आणखी एक राजकारणी आपण गमावला आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो आणि त्यांच्या परिवारजनांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो हीच प्रार्थना असल्याचे ना.श्री.मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.