नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी नेते, जनता दल युनायटेडचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे गुरुवारी रात्री प्रदीर्घ आजाराने निधन (Senior Socialist Leader Sharad Yadav Passes Away) झाले. ७५ वर्षीय यादव यांच्या निधनाने राजकारणातील अजातशत्रू आणि समाजवादी विचारा खंदा पुरस्कर्ता नेता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. जयप्रकाश नारायण आणि डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली होती. आयुष्याच्या अखेरपर्यंत शरद यादव यांनी समाजवादी विचारांचा पुरस्कार केला होता. अभियात्रिकीचे शिक्षण घेतलेले यादव नंतर राजकारणात रमले व त्यांना अकरावेळा खासदार होण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे ते वयाच्या पंचविशीतच ते खासदार झाले होते.
शरद यादव यांचा जन्म मध्यप्रदेशचा. पण त्यांची कर्मभूमी बिहार आणि उत्तर प्रदेश राहिली. त्यांनी इंजिनीअरिंगची पदवी घेतली होती. ते इंजिनीअरिंगचे गोल्ड मेडलिस्ट होते. त्यांनी जबलपूरच्या इंजिनीअरिंग कॉलेजातून बीईची डिग्री घेतली होती. देशात आणीबाणी लागू झाल्यानंतर त्यांनी लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात आंदोलनात उडी घेतली. त्यामुळे ते अनेक महिने तुरुंगात होते. जबलपूरमधील या रिक्त जागेवर शरद यादव यांना पीपल्स पार्टीचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. त्यावेळी शरद यादव तुरुंगात होते. 1974मध्ये जेपींनी शरद यादव यांना आपला पहिला उमेदवार म्हणून घोषित केले होते. या निवडणुकीत यादव एक लाखाहून अधिक मताने विजयी झाले होते. संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर त्यांनी राजीव गांधी यांच्याविरोधात अमेठी लोकसभा मतदारसंघातून ज्योतिषाच्या सल्ल्याने निवडणूक लढविली होती. मात्र, त्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला.
1990मध्ये एनडीएच्या काळात नितीश कुमार आणि जॉर्ज फर्नांडिस सारखे नेत्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. तर लालूप्रसाद यादव हे काँग्रेसच्या बाजूने होते. शरद यादव यांनाही भाजपला पाठिंबा देणे मान्य नव्हते. मात्र रामविलास पासवान आणि इतर नेत्यांच्या सांगण्यावरून ते भाजपसोबत जाण्यास तयार झाले. वाजपेयींच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. 2013मध्ये भाजपने मोदींना प्रचार समितीचे अध्यक्ष बनवले. त्यामुळे बिहारमध्ये जनता दलाने एनडीएतून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता. शरद यादव तेव्हा एनडीएचे संयोजक होते. एवढ्या मोठ्या कालावधीनंतर एनडीएतून बाहेर पडण्यास शरद यादव तयार नव्हते. मात्र, नितीश कुमार यांच्या हट्टामुळे त्यांना एनडीएतून बाहेर पडावे लागले होते.
नेत्यांची श्रद्धांजली
शरद यादव या समाजवादी नेत्याच्या जाण्याने राजकीय वर्तुळातही शोककळा पसरली आहे. शरद यादव यांच्या जाण्याने दु:ख झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ‘प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी खासदार आणि मंत्री म्हणून वेगळी ओळख निर्माण केली होती. लोहिया यांच्या विचारांनी त्यांना खूप प्रेरणा मिळाली होती. त्याच्याशी झालेले प्रत्येक संभाषण मला आठवेल’, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले आहे.