(Jitendra Awhad Arrested )राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक

0

ठाणे : हर हर महादेव या चित्रपटावर आक्षेप घेत त्याचा ठाण्यातील शो बंद पाडणे तसेच यावेळी प्रेक्षकांना मारहाण केल्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक (Jitendra Awhad Arrested ) केली आहे. ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी ही कारवाई केली. या अटकेनंतर आपण जामीन घेणार नसल्याचे आव्हाड यांनी सांगितले. आव्हाड यांच्यासह आणखी काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. राड्याप्रकरणी आव्हाड यांच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. वर्तकनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी 141,143,146, 149, 323, 504, मुंबई पोलीस कायदा कलम 37/135 आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी परीक्षित विजय धुर्वे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईनंतर आव्हाड यांनी सरकार दडपशाही करीत असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी सुरुवातीला लावलेली कलमे जामीनपात्र होती. मात्र, काही कलमे अधिकची लावण्यात आली, असा दावा त्यांनी केला. ‘हर, हर महादेव’ चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण झाले आहे. शिवाजी महाराजांची बदनामी झाली आहे. या बदनामीला विरोध करत असल्याने अटकेची कारवाई होत असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे. सरकार मला शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास सांगण्यापासून रोखत आहे. हे सरकार कोणाचे आहे, हे स्पष्ट होत असल्याचे आव्हाड यांनी म्हटले.
तर जेलमध्ये ठेवा-मनसे
दरम्यान, मनसेने आव्हाड यांच्यावरील कारवाईचे स्वागत केले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, कायदा आपले काम करीत आहे. ज्यापद्धतीने तुम्ही एका क्षेत्रात जाता, प्रेक्षकांना मारहाण करता ते चुकीचे आहे. सुडबुद्धीने कारवाई करण्याचा प्रश्नच नाही. अशी थेरं करत असतील तर त्यांना आयुष्यभर जेलमध्ये ठेवलं पाहिजे. आधीही मंत्री असताना एकाला घरी बोलावून मारहाण केली होती. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही केली होती, असे ते म्हणाले.