राष्ट्रधर्म

0

 

आपण भारतीय सारे बांधव आहोत, आपण एक आहोत, आपल्यात धर्म आणि जात हा भेदभावच नाही असं आमच्या बालपणापासून आमच्या घरातून आणि शाळांमधून शिकवल्या जायचं. त्यामुळे जात आणि धर्म हा आमच्या मित्रांच्या आड कधीही येत नव्हता, अगदी स्वयंपाकघरतही तो शिरलेला आठवत नाही, स्वच्छता हा विषय सोडून. त्यामुळे आमचं एकमेकांकडे फराळ अथवा जेवन हे अगदी बिनदिक्कतपणे व्हायचं. अर्थात काही समाज आणि धर्ममार्तंडांनी हा भेद अनेक वर्षे पाळला आणि अजूनही पाळला जातो आहे हे फक्त वरवरच आम्ही ऐकत आलो होतो. आमच्या इतिहासातील थोर महामानवांनी हा भेद दूर करण्याचा यशस्वी प्रयत्न केला हेसुद्धा आम्ही जाणतो आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच भारत हे सर्वधर्मसमभाव असलेले एकमेव राष्ट्र आहे हे अभिमानाने आपण सारेच सांगत आलेलो आहोत. आपल्या राष्ट्राच्या ह्या वैशिष्ट्याकडे विश्वातील अनेक देश अत्यंत कौतुकाने बघत असतात.

आता मात्र, म्हणजे गेल्या जवळपास दोन-तिन दशकांपासून पुन्हा ह्या जात आणि धर्मभेदाच्या भिंती ऊभारण्याला सुरुवात झाली की काय अशी शंका यायला लागलेली आहे. अर्थात इतिहासातील जात आणि धर्मभेदाची सुरुवात समाजव्यवस्थेमुळे झाली असं म्हटल्या गेलं, परंतु ह्या दोन-तिन दशकात हा भेद राजकीय अविचार आणि सत्ताप्राप्तिच्या अमर्याद लालसेतून होताना दिसतो आहे.

अनेक राजकीय पक्ष आपल्या राज्यप्राप्तीची हाव पूर्ण होण्याकरीता कुठल्याही थराला जाऊन जनभावनेमध्ये जाती आणि धर्मभेदाचे विष पसरवताना दिसतात. आपण काय बोलतो, कुणाशी बोलतो आणि किती बोलतो हे राजकारणातील पक्षांच्या प्रवक्त्यांना लक्षात येत नाही असे नाही. आपल्या बोलण्यातून, संवादांतून आपण इतर पक्षावर तोंडसूख घेतो आहे ह्यामागील समाधानातून आपल्या बोलण्या आणि वागण्यातून आपण आपल्याच राष्ट्राचे नुकसान करतो आहे ह्याकडेही ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात.

सध्या आपल्या देशातील वातावरण कलुषीत करण्याचे काही राजकीय पक्षांचे जे मनसुबे आहेत आणि त्यासाठी जाती आणि धर्मभेदाचे विषय समोर आणण्यासाठी तरुणाईला हाताशी धरून सामाजिक माध्यमांचा दुरुपयोग त्यांनी सुरु केलेला त्यामुळे कधी ना कधी तेच अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही.

काही दिवसांपासून राजकीय स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाऊन, कुठले ना कुठले कारण समोर करुन अराजकता पसरविण्याची तयारी सुरु केल्याचे निदर्शनास येत आहे. अशा कृतीने असे पक्ष आपल्या स्वार्थी पक्षीय राजकारणाच्या माध्यमातून राष्ट्रद्रोह करीत आहेत किंवा राष्ट्रद्रोह्यांना मदत करीत आहेत हे लक्षात घेता आता जनतेने समोर येत अशा स्वार्थी राजकीय महाभागांना त्यांची योग्य जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे.

चला तर राष्ट्रधर्म जागृतीचा मंत्र घेऊन जाती आणि धर्मभेद दूर करण्याची केवळ प्रतिज्ञा नव्हे तर कृती करु या.

मधुसूदन (मदन) पुराणिक, चंद्रपूर