
४६१ पदांपैकी ११२ विद्यार्थ्यांनी नोंदविला ठसा
नागपूर (Nagpur):- शिक्षणाच्या बळावर सामाजिक परिवर्तन घडविण्याची ताकद काय असते, याचा ठसा महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूरने पुन्हा एकदा उमटवला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२४ च्या विविध २० संवर्गातील ४६१ पदांसाठी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेत ‘महाज्योती’च्या तब्बल ११२ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. या निकालात सुमारे २५ टक्के यश मिळवत महाज्योतीने बहुजन समाजाच्या उन्नतीचा नवा इतिहास रचला आहे. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेली ही स्वायत्त संस्था गेल्या साडेपाच वर्षांपासून ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण, सक्षम मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य देत आहे. या सातत्यपूर्ण आणि दूरदृष्टीपूर्ण प्रयत्नांचे भक्कम फलित एमपीएससी २०२४ च्या निकालातून स्पष्टपणे समोर आले आहे. या परीक्षेत ‘महाज्योती’च्या एकूण ११२ विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून, त्यात ८२ विद्यार्थी आणि ३० विद्यार्थिनींचा समावेश आहे. ही केवळ यशाची आकडेवारी नसून, समाजपरिवर्तनाचा मजबूत पाया असल्याचे मत ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक मा. मिलिंद नारिंगे यांनी व्यक्त केले.
एमपीएससीच्या अंतिम निकालात विविध महत्त्वाच्या पदांवर ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांनी ठसा उमटवला आहे. सहाय्यक आयुक्त (राज्य कर) गट-अ मध्ये ३३ विद्यार्थी, तपासणी अधिकारी (पुरवठा) गट-ब मध्ये २०, सहाय्यक गटविकास अधिकारी गट-ब मध्ये ११, तसेच सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) व आदिवासी विकास आयुक्तालय गट-ब मध्ये १० विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. याशिवाय सहाय्यक संचालक (वित्त व लेखा सेवा) गट-अ मध्ये ७, गटविकास अधिकारी (उच्च श्रेणी) गट-अ मध्ये ७, पोलिस उपअधीक्षक/सहायक पोलिस आयुक्त गट-अ मध्ये ५, मंत्रालय विभाग अधिकारी गट-ब मध्ये ४, तसेच कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन अधिकारी गट-ब मध्ये ४ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. मुख्याधिकारी/सहायक आयुक्त गट-अ मध्ये ३, उद्योग तांत्रिक उपसंचालक गट-अ मध्ये २, तसेच विविध अन्य पदांवर प्रत्येकी १ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. या यशातून ‘महाज्योती’च्या प्रशिक्षणाची गुणवत्ता आणि परिणामकारकता अधोरेखित झाली आहे. संस्थेने विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक मार्गदर्शनच दिले नाही, तर त्यांचा आत्मविश्वास उंचावण्याचे कार्य केले आहे. स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक आधुनिक साधने, डिजिटल स्रोत आणि सर्वसमावेशक नियोजन उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा दिली आहे. या यशाचा प्रभाव केवळ विद्यार्थ्यांपुरता मर्यादित नसून, त्याचा थेट परिणाम हजारो कुटुंबांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीवर होत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, समताधिष्ठित दृष्टिकोन आणि नियोजनबद्ध प्रशिक्षण यामुळे ‘महाज्योती’ आज बहुजन विद्यार्थ्यांसाठी आशेचे आणि संधीचे केंद्र ठरले आहे. शासनाच्या विविध विभागांत संधी मिळवून महाज्योतीचे विद्यार्थी समाजाच्या विकासात मोलाची भूमिका बजावतील, असा विश्वास ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक मा. मिलिंद नारिंगे यांनी व्यक्त केले आहे.
समाजाभिमुख अधिकारी घडविणे हेच ध्येय : मिलिंद नारिंगे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२४ च्या मुख्य परीक्षेत ‘महाज्योती’च्या ११२ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले असून हे यश केवळ विद्यार्थ्यांचे नसून संपूर्ण समाजाच्या प्रगतीचे प्रतीक आहे. ‘महाज्योती’ने समाजाभिमुख अधिकारी घडविणे हेच ध्येय हाती घेतले असून त्याची फळ अंतिम निकालातून दिसून येत असल्याचे ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक मा. मिलिंद नारिंगे यांनी सांगितले. ‘महाज्योती’ने मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य देण्यावर सातत्याने भर दिला आहे. त्यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संस्थेचा उद्देश केवळ परीक्षेत यश मिळविणे नसून विद्यार्थ्यांना सक्षम, जबाबदार आणि समाजाभिमुख अधिकारी बनविणे हा आहे. आधुनिक साधनसामग्री, अभ्यासपूर्ण मार्गदर्शन आणि नियोजनबद्ध तयारी यांच्या बळावर हे यश शक्य झाले आहे. भविष्यातही अधिकाधिक विद्यार्थ्यांना संधी देत त्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी महाज्योती कटिबद्ध राहील, असा विश्वास मा. मिलिंद नारिंगे यांनी व्यक्त केला.
बहुजन विद्यार्थ्यांच्या यशातून समतेच्या विचारांना नवी बळकटी : अतुल सावे
‘महाज्योती’च्या ११२ विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री तसेच ‘महाज्योती’चे अध्यक्ष अतुल सावे यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, हे यश केवळ विद्यार्थ्यांच्या परिश्रमांचे फळ नसून राज्य शासनाच्या समताधिष्ठित धोरणांचा आणि ‘महाज्योती’च्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम आहे. मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, सक्षम मार्गदर्शन आणि आवश्यक आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देण्याचा शासनाचा उद्देश ‘महाज्योती’च्या माध्यमातून प्रभावीपणे साध्य होत आहे. या संस्थेने विद्यार्थ्यांच्या क्षमतेला योग्य दिशा देत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला आहे, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे. हे यश समाजातील वंचित घटकांसाठी प्रेरणादायी ठरणारे असून, अधिकाधिक युवकांनी स्पर्धा परीक्षांकडे वळावे आणि शासन सेवेत स्थान मिळवून समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भविष्यातही अशा उपक्रमांना अधिक बळ देत समतेचा आणि शिक्षणाचा मार्ग अधिक दृढ करण्यासाठी शासन कटिबद्ध राहील, असा विश्वासही मा. अतुल सावे यांनी व्यक्त केला आहे.
विकास गडपायले
प्रकल्प व्यवस्थापक
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती),
महाराष्ट्र राज्य, नागपूर
प्रति,
१) मा. संपादक,प्रिंट, ईलेक्ट्रानिक, डिजीटल माध्यम
२) मा.संचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई
३) मा.जिल्हा माहिती अधिकारी (सर्व जिल्हे)
Related posts:
विदर्भ साहित्य संघात ग.त्र्यं. माडखोलकर स्मृती व्याख्यानमाला १९ एप्रिल रोजी
April 18, 2026Artical Blog
शिक्षण संस्थानी शिक्षण विभागाचे ‘समायोजन’ आदेश स्वीकारू नये, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळा...
April 18, 2026Artical Blog
वि. सा. संघाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी आर्थिक सहकार्य करा...
April 18, 2026MAHARASHTRA



















