अशोक सराफ यांचा नमुंमपाकडून सन्मान

0

नवी मुंबई, (New Mumbai)8 मार्च  : आपल्या चतुरस्त्र अभिनयाने नाट्य, चित्रपट व दूरचित्रवाहिनी या तिन्ही क्षेत्रात आपली अक्षय नाममुद्रा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकतेच महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानीत केले आहे. त्याबद्दल महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नुकतेच महानगरपालिकेच्या वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘व्हॅक्युम क्लिनर’ या नाट्यप्रयोगाप्रसंगी अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात आले.

महापालिका अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या शुभहस्ते, उपआयुक्त मंगला माळवे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ प्रदान करीत नवी मुंबई महागरपालिकेच्या वतीने हा सन्मान करण्यात आला.

वयाच्या अठराव्या वर्षी वि.वा.शिरवाडकर लिखित ‘ययाती आणि देवयानी’ नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलेल्या अशोक सराफ यांनी विनोद सादरीकरणाची सहज शैली, परफेक्ट टायमींग आणि कोणत्याही साच्यात न अडकता विनोदी, गंभीर ते अगदी खलनायकी साच्यातील विविधरंगी भूमिकांतून साकारलेल्या अप्रतिम अभिनयामुळे 50 हून अधिक वर्षे मराठी रसिक मनांवर राज्य केले.

त्यांच्या या उत्तुंग अभिनय कर्तृत्वाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र भूषण’ हा राज्यातील सर्वोच्च पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा केलेला गौरव सर्वांनाच आनंद देणारा आहे. म्हणूनच नवी मुंबईकर महानगरपालिकेनेही समस्त नवी मुंबईकर कलाप्रेमी रसिक नागरिकांच्या वतीने अभिनंदन करीत त्यांचा यथोचित सन्मान केला.